पुणे- आंबा प्रेमींसाठी एक आनंदाची बातमी आहे. आता चक्क आंबे हप्त्यावर मिळणार आहेत! त्यामुळे आता सर्वसामान्य नागरिकही महागडे आंबे खरेदी करु शकणार आहेत. पुण्यातील सिंहगड परिसरात आंबे विक्रीचा व्यवसाय करणार्या गौरव सणस या व्यावसायिकाने आंबा विक्रीसाठी हप्त्याची सुविधा दिली आहे. त्यांच्या या कल्पनेला यश आले असून दोन ग्राहकांनी त्यांच्याकडून हप्त्यावर आंबे घेतले आहेत. गौरव यांनी या संदर्भात म्हटले की, हापूस आंबा हा महागडा असतो. लोक एकाच वेळी संपूर्ण रक्कम भरू शकत नसल्याने अनेक गोष्टी हप्त्यावर घेतात. मी हीच संकल्पना आंब्यासाठी वापरली. देवगड आंब्याचे पेटीचे दर काही हजारात आहे. त्यामुळे हे आंबेदेखील हप्त्यावर विकण्याचे सुचले. त्यानुसार पेटीएमच्या माध्यमातून ही कल्पना मी प्रत्यक्षात आणली आहे. सध्या नागरिकांसाठी सणस यांनी होम डिलिव्हरीदेखील सुरू केली आहे.