तेहरान- हमासचा प्रमुख इस्माईल हानिया याच्या हत्येनंतर इराण येथील कोम जामकरन मशिदीच्या घुमटावर लाल ध्वज फडकला आहे. हा झेंडा सूडाची निशाणी समजली जाते.यामुळे इराण आणि इस्रायल या दोन देशांमध्ये भविष्यात तणाव वाढू शकतो, असे सध्या दिसून येत आहे.
इस्माईन हानियाह हे नवे राष्ट्रपती मसूद पेजेशकियन यांच्या शपथविधीसाठी इराणमध्ये होते.हत्येच्या काही वेळ अगोदर सुप्रीम लीडर आयतुल्लाह अली खामेनी यांच्यासोबत त्यांचे बोलणे झाले होते.दोघांचे फोटोही प्रसिद्ध झाले होते.खामेनी यांनी मीडियावर याचा एक व्हिडीओदेखील शेअर केला होता.त्यात हानिया सर्वोच्च नेत्याला भेटत असल्याचे दिसत आहे आणि त्यांनी एकमेकांशी गळाभेटही घेतली होती.इस्लामिक रिव्हॉल्युशनरी गार्डच्यावतीने एक निवेदन जारी करण्यात आलेले आहे. त्यात हानिया यांच्या हत्येचा निषेध करण्यात आला आहे. इराणने हमास प्रमुखाच्या हत्येला भ्याड हल्ला म्हटले आहे.
‘रिव्हॉल्यूशनरी गार्ड’ने म्हटले की, हानिया यांची हत्या इस्राईलने गाझामधील आपले अपयश झाकण्यासाठी आणि जगाचे लक्ष विचलित करण्यासाठी केली आहे. अत्याधुनिक हत्यारे घेऊन मागील ९ महिन्यांपासून इस्रायली सेना तैनात आहे. तरीही त्यांना यश मिळाले नाही. गाझामध्ये लहान मुले, महिला आणि वृद्धांना छळल्याच्या प्रकरणावरुन लक्ष विचलित करण्याचा हा प्रयत्न आहे.