हातकणंगले – कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यातील आळते गावात सध्या डेंग्यू साथीच्या आजाराने थैमान माजवले आहे.डेंग्यू झालेले तब्बल ४०० हून अधिक रुग्ण खासगी आणि शासकीय रुग्णालयात उपचार घेत आहेत.यातील एका महिलेचा मृत्यू झाल्याने आता तर आरोग्य यंत्रणा अधिकच खडबडून जागी झाली आहे.
समिना शागिर मेवेकरी असे या डेंग्यू आजारामुळे दगावलेल्या विवाहित महिलेचे नाव आहे.या महिलेच्या मृत्यूनंतर गटविकास अधिकारी आणि आरोग्य अधिकारी यांनी तत्काळ या गावाला भेट देऊन पाहणी केली. समाधानकारक बाब म्हणजे ग्रामपंचायत आणि सामाजिक संघटनांनी तातडीने उपाय योजना सुरू केल्याने रूग्णांना वेळेवर उपचार मिळत आहेत. तरीही नागरिकांनी या आजाराबाबत घाबरून न जाता आरोग्य यंत्रणांच्या सूचनांचे पालन करावे असे आवाहन आळते गावचे सरपंच अजिंक्य इंगवले यांनी केले आहे.दरम्यान,हा डेंग्यूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी आज मंगळवारी गावातील पाणीपुरवठा एक दिवस बंद ठेवून ‘ड्राय डे ‘ पाळण्यात आला.आज सर्व नागरिकांनी आपले शिल्लक पाणी वापरून पाणीसाठे मोकळे केले होते.
हातकणंगले तालुक्यातील आळतेत डेंग्यूचे थैमान! १ मृत्यू
