नवी दिल्ली – बांगलादेशातील हिंसक आंदोलनानंतर राजीनामा देऊन काल भारतात आलेल्या बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांचा मुक्काम सध्या तरी भारतातच राहणार आहे. शेख हसीना यांना इंग्लंडमध्ये राजकीय आश्रय हवा आहे. परंतु इंग्लंडने त्यांच्या आश्रयाला अद्यापी मान्यता न दिल्याने त्या भारतात थांबल्या आहेत. हसीना यांच्याबाबत भारताने अजून कोणतीही भूमिका घेतलेली नसली तरी त्यांच्याशी सविस्तर चर्चा झाल्याचे आज भारताचे परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सांगितले. या चर्चेचा तपशील त्यांनी जाहीर केला नाही. मात्र इतर कुठल्या देशात आश्रय मिळेपर्यंत हसीना यांना भारत साथ देईल, असे स्पष्ट होत आहे. त्यातच आज अमेरिकेने हसीना यांचा व्हिसा रद्द केला. तिकडे बांगलादेशातील हिंसाचार आज आणखी भडकला. त्यात हिंदूंची मंदिरे आणि मालमत्तांवर हल्ल्यांच्या अनेक घटना घडल्या.
शेख हसीना यांना घेऊन आलेले बांगलादेशच्या लष्कराचे विमान काल गाझियाबाद येथील वायुदलाच्या हिंडेन विमानतळावर उतरले. तेव्हापासून शेख हसीना या विमानतळावरील गेस्ट हाऊसमध्येच आहेत. आज त्यांना घेऊन आलेले लष्करी विमान बांगलादेशला परत गेले. परंतु या विमानातून शेख हसीना परतल्या नाहीत. त्यामुळे काही दिवस त्यांचा मुक्काम भारतात असेल, हे स्पष्ट झाले. राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी त्यांची काल हिंडेन विमानतळावर जाऊन भेट घेतली. या भेटीत त्यांच्या भारतातील वास्तव्याविषयी चर्चा झाल्याचे सांगण्यात
येत आहे.
आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी संसदेमध्ये बांगलादेशातील सध्याच्या परिस्थितीवर संसदेत निवेदन केले. ते म्हणाले की, शेख हसीना यांनी देश सोडल्यानंतर भारतात येण्यासाठी विनंती केली होती. त्यांनी खूप कमी वेळात भारतात येण्याची परवानगी मागितली. त्या संध्याकाळी भारतात पोहोचल्या. बांगलादेशमध्ये घडणार्या सर्व घडामोडींवर भारताची बारीक नजर आहे. बांगलादेशमध्ये सध्या जवळपास 9 हजार भारतीय विद्यार्थी आहेत. बांगलादेशात हिंदूंविरोधी हिंसा सुरू असून, ही चिंतेची
बाब आहे.
बांगलादेशमध्ये निर्माण झालेल्या राजकीय पेचप्रसंगाची माहिती देण्यासाठी आज परराष्ट्र मंत्री एस. जयशंकर यांनी सर्वपक्षीय बैठकही बोलावली होती. संसद भवनात आज सकाळी ही बैठक पार पडली. या बैठकीला विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यासह तृणमूल काँग्रेस आणि इंडिया आघाडीतील अन्य घटक पक्षाचे नेते उपस्थित होते. भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह हेही या बैठकीला उपस्थित होते. बांगलादेशबद्दल सरकार जी भूमिका घेईल त्याला आपला पाठिंबा असेल, अशी सकारात्मक भूमिका यावेळी विरोधी पक्षांनी घेतली.
या बैठकीत राहुल गांधींनी सरकारला शेख हसीना यांच्या पुढील नियोजनाबाबतही विचारणा केली. मात्र, त्यावर सविस्तर उत्तर देण्यास जयशंकर यांनी नकार दिला. भारत सरकारने यासंदर्भात शेख हसीना यांच्याशी सविस्तर चर्चा केली आहे. मात्र, त्यासंदर्भातील माहिती आत्ताच उघड करता येणार नाही, असे जयशंकर म्हणाले. दरम्यान, बांगलादेशात गेले काही दिवस सुरू असलेला हिंसाचार आज शिगेला पोहोचला. अनेक ठिकाणी आजही लुटालूट आणि जाळपोळीच्या घटना घडल्या. आंदोलक शेरपूरच्या कारागृहात लाठ्या घेऊन घुसले आणि त्यांनी 500 कैद्यांना कारागृहातून बाहेर काढले. पोलीस ठाण्यांनाही लक्ष्य केले. ढाका शहरात ठिकठिकाणी आगी लावल्या जात होत्या. जबीर इंटरनॅशनल हे हॉटेल पेटवून 34 जणांना जिवंत जाळल्याची घटना घडली. अनेक ठिकाणी हिंदूंना लक्ष्य करून दुकानांची टाळी तोडून आतील वस्तू पळवण्यात आल्या. हिंदू मंदिरे आणि हिंदूंच्या मालमत्तांवर हल्ले करण्यात आले. एकूण 27 जिल्ह्यांमध्ये हिंदूंवर हल्ले करण्यात आले. खुलना प्रांतामधील मेहेरपूर येथे असलेल्या इस्कॉन मंदिरात जाळपोळ करण्यात आली. बांगलादेशी हिंदू क्रिकेटपटू लिटन दासच्या घरावर हल्ला करून ते ताब्यात घेण्यात आले. क्रिकेट संघाचा माजी कर्णधार मशरुफे मुर्तझा यांचेही घर पेटवून देण्यात आले. लष्कर रस्त्यावर असूनही दंगेखोर मुक्तपणे जाळपोळ आणि मोडतोड करत होते. काल मोडतोड करण्यात आलेला वंगबंधू मुजीबूर रहेमान यांचा पुतळाही जमावाने पूर्णपणे उद्ध्वस्त केला. अनेक ठिकाणी लष्कराला गोळीबार
करावा लागला.
बांगलादेशच्या माजी पंतप्रधान
खालिदा झिया यांची सुटका
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांनी राजीनामा देऊन देशातून पलायन केल्यानंतर माजी पंतप्रधान खालिदा झिया यांचा तुरुंगातून सुटका होण्याचा मार्ग मोकळा झाला. राष्ट्रपती मोहम्मद शहाबुद्दीन यांनी त्यांच्या सुटकेचे आदेश दिले. खालिदा झिया या शेख हसीना यांच्या विरोधक मानल्या जातात. शेख हसीना यांच्या राजीनाम्यानंतर आता खालीदा झिया या केंद्रस्थानी आल्या आहेत. राष्ट्रपती शहाबुद्दीन यांनी आरक्षणाच्या मुद्यावरून आंदोलन करणार्या विद्यार्थ्यांना शेख हसीना यांच्या सरकारने अटक केली होती. त्या सर्व आंदोलकांची सुटका करण्याचे आदेशही शहाबुद्दीन
यांनी दिले आहेत.
तीन विद्यार्थ्यांच्या आंदोलनाने
हसीना यांना देश सोडावा लागला
बांगलादेशच्या पंतप्रधान शेख हसीना यांना सत्ता सोडायला भाग पाडण्यात तीन विद्यार्थी नेत्यांनी महत्त्वाची भूमिका होती. या विद्यार्थ्यांनी विद्यापीठ परिसरातून सुरू केलेल्या आंदोलनाने एवढे विक्राळ रुप धारण केले की, हसीना यांना पंतप्रधानपदाचा राजीनामा देऊन देशातून पलायन करावे लागले. नाहीद इस्लाम, आसिफ महमूद आणि अबू बकर मजुमदार हे ते तीन विद्यार्थी
नेते आहेत.
नाहीद इस्लाम हा विद्यार्थी चळवळीचा सर्वात महत्त्वाचा चेहरा आहे. तो ढाका विद्यापीठाचा विद्यार्थी आहे. 20 जुलै रोजी त्याला पोलिसांनी ताब्यात घेतले. त्याला पोलीस ताब्यात घेतानाचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. त्यानंतर नाहीद 24 तासांनी एका पुलाखाली बेशुध्दावस्थेत आढळला. आपल्याला पोलिसांनी लोखंडी रॉडने मारहाण केली, असा दावा त्याने शुध्दीवर आल्यानंतर केला. नाहीदच्या चेहर्यावर मारहाणीच्या जखमा दिसत होत्या. या व्हिडिओमुळे आंदोलक भडकले. ते अधिक हिंसक होत
रस्त्यावर उतरले.
आसिफ महमूद हा ढाका विद्यापीठातील भाषा विषयाचा विद्यार्थी आहे. जूनमध्ये सुरू झालेल्या आरक्षणविरोधातील
आंदोलनात तो उतरला. 26 जुलै रोजी बांगलादेशच्या गुप्तचर खात्याने त्याला ताब्यात घेतले. त्याला मारहाण करून आंदोलन मागे घेण्याचे आवाहन करणारा व्हिडिओ गुप्तचर खात्याने बनवला. आसिफला गुंगीचे इंजेक्शन देण्यात आले. त्यामुळे तो काही दिवस बेशुध्द होता.
अबू बकर मजुमदार हा शेख हसीना यांना सत्तेवरून पायउतार होण्यास भाग पाडणार्या विद्यार्थी नेत्यांपैकी तिसरा चेहरा आहे. तो ढाका विद्यापीठातील भूगोल विषयाचा विद्यार्थी आहे. तो मानवाधिकार कार्यकर्ता आहे. 5 जून रोजी उच्च न्यायालयाने आरक्षणावर निर्णय दिल्यानंतर बकर याने आपल्या सहकार्यांसह न्यायालयाच्या निकालाच्या विरोधात आंदोलन सुरू केले. 19 जुलै रोजी बकरचे अज्ञात व्यक्तींनी धामंडी येथून अपहरण केले. दोन दिवसांनी त्याला सोडून देण्यात आले. त्यानंतर बकर याने प्रसारमाध्यमांना सांगितले की, त्याला पोलिसांनी एका कोठडीत बंद करून ठेवले होते. त्याच्यावर आंदोलन मागे घेण्यासाठी पोलीस दबाव आणत होते. विद्यार्थी नेत्यांच्या या धरपकडीमुळे आणि त्यांना मारहाण केल्यामुळे आंदोलन चिघळले आणि सत्ता सोडून देशाबाहेर पलायन करण्याची नामुष्की शेख हसीना यांच्यावर आली.