मुंबई – शहरातील हवा प्रदूषित होत असल्याने हवेचा गुणवत्ता स्तर राखण्यासाठी आता डेब्रिज कचरा रस्त्यांवर फेकणारे मुंबई महापालिकेच्या रडारवर आले आहेत. बांधकाम सुरू असलेल्या ठिकाणचा विकासक असो वा घरातील डेब्रिज कचरा रस्त्यांवर फेकताना आढळताच २० हजार रुपये दंड वसूल करण्यात येण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने घेतला आहे. यासाठी पालिकेच्या २४ वॉर्डात पथक नियुक्त केले असून, पालिका मुख्यालयातील ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचा वॉच असणार आहे.मुंबई व परिसरात मोठ्या प्रमाणावर होत असलेली विकास कामे, बांधकामे यासह हवेतील बदलामुळे हवेचा गुणवत्ता स्तर खालावतो. प्रदूषणासाठी धूळ कारणीभूत ठरली आहे. हवेचे प्रदूषण रोखण्यासाठी धूळ नियंत्रण करण्यासाठी पालिकेच्या विभाग कार्यालयांच्या स्तरावर कृती दल अर्थात टास्क फोर्सची नियुक्ती करण्यात आली आहे. टास्क फोर्ससह २४ वॉर्डात पथकांची नियुक्ती करण्याचेही आदेश आयुक्तांनी दिले आहेत. रस्त्यांवर कचरा फेकणाऱ्यांवर या पथकांची नजर असणार आहे. कारवाईला वेग देण्यासाठी आता मुंबईत ठिकठिकाणी बसवण्यात आलेल्या ५ हजार सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची नजर असणार आहे. तसेच मुंबईतील प्रदूषणास बांधकाम कारणीभूत असल्याचे स्पष्ट होताच संबंधित विभाग सहाय्यक आयुक्तांनी तेथील बांधकाम विकासकाला काम बंदची नोटीस बजावत काम थांबवावे, असेही स्पष्ट आदेश दिले आहेत.
हवेच्या गुणवत्तेसाठी पालिकेची मोहिम! रस्त्यावर कचरा फेकणाऱ्यांना दंड
