चंडीगढ- हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी नायब सिंह सैनी यांनी आज शपथ घेतली. विशेष म्हणजे ते सलग दुसऱ्यांदा हरियाणाच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झाले. हरियाणाचे राज्यपाल बंडारू दत्तात्रेय यांनी सैनी यांना पद आणि गोपनियतेची शपथ दिली. पंचकुला येथील सेक्टर ५ मधील दसरा मैदानावर हा शपथविधी सोहळा झाला. यावेळी कृष्णन लाल पनवार, राव नरबीर सिंह, महिपाल ढांडा आणि विपूल गोयल, अरविंद कुमार शर्मा, श्याम सिंह राणा, रणवीर सिंग गंगवा, कृष्णन बेदी यांनी हरियाणा सरकारमध्ये कॅबिनेट मंत्री म्हणून शपथ घेतली. तर आरती सिंह राव, राजेश नागर, गौरव गौतम, श्याम सिंग राणा, रणवीर गंगवा, कृष्णा बेदी, श्रुती चौधरी यांनीही हरियाणा सरकारमध्ये राज्यमंत्री म्हणून शपथ घेतली. दरम्यान, तीन अपक्ष आमदार सावित्री जिंदाल, राजेश जून आणि देवेंद्र कादियान यांनी भाजपा सरकारला पाठिंबा जाहीर केला आहे.
या शपथविधी सोहळ्याला पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहा, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, केंद्रीय मंत्री आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा, केंद्रीय मंत्री रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार, उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्यासह भाजपा-एनडीएशासित १८ राज्यांचे मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री उपस्थित होते.