चंदीगढ – हरियाणा विधानसभा निवडणुकीत भाजपाने बहूमत मिळवले असून राज्याच्या मुख्यमंत्रिपदाची निवड दसऱ्यानंतरच होणार असल्याची माहिती काळजीवाहू मुख्यमंत्री नायब सैनी यांनी आज दिली. सैनी यांनाच पुन्हा मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता आहे.
हरियाणा निवडणुकीच्या निकालातील भाजपाच्या विजयानंतर आता येथील राजकीय घडामोडींना वेग आला आहे. सैनी यांनी काल नवी दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह पक्षाच्या विविध ज्येष्ठ नेत्यांची भेट घेतली. ही भेट शिष्टाचार म्हणून घेतली असून दसऱ्यानंतर केंद्रीय निरिक्षकांचे एक पथक हरियाणात येणार आहे. यावेळी ते विधिमंडळ सदस्यांची भेट घेतील त्यानंतर सदस्यांच्या बैठकीत नेता निवडीची प्रक्रिया पूर्ण होईल. सैनी यांच्यासह दोन उपमुख्यमंत्र्यांनाही शपथ देण्याची शक्यता व्यक्त होत आहे. एका मागासवर्गीय व्यक्तीला उपमुख्यमंत्रिपद देऊन सर्व समाजांना आपल्याबरोबर ठेवण्याची रणनीतीही भाजपा आखण्याची शक्यता आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनीही पक्षाच्या कार्यकर्त्यांना संबोधित करताना सैनी यांचा विशेष उल्लेख केल्यामुळे त्यांनाच मुख्यमंत्रिपद मिळण्याची शक्यता राजधानीत व्यक्त केली जात आहे.