तेल अवीव – इस्रायल व हमासमध्ये युद्धबंदी व ओलिसांना सोडण्यासाठी कतार इथे दोन्ही देशांमध्ये चर्चा सुरु असतानाच हमासने अपहरण केलेल्या एका महिला सैनिकाचा व्हिडीओ जारी केला आहे. हा व्हिडीओ जारी करुन हमास इस्रायलवर दबाव वाढवण्याचा प्रयत्न करत असल्याची चर्चा आहे.
हमासने ७ ऑक्टोबर २०२३ रोजी इस्रायलवर हल्ला केला होता. या हल्ल्यावेळी त्यांनी लिरी अल्बाग या तरुणीचे अपहरण केले होते. ती गेल्या साडेचारशे दिवसांपासून ओलीस आहे. जारी करण्यात आलेला व्हिडीओ काही दिवसांपूर्वीचा असून इस्रायली प्रसारमाध्यमांनी मात्र हा व्हिडीओ प्रसारित केलेला नाही. लिरी अल्बाग ही तरुणी महिला सैनिक असून हल्ल्याच्या वेळी ती नाहल ओझ लष्करी तळावर तैनात होती. यावेळी तिच्यासह सहा महिला सैनिकांचे अपहरण करण्यात आले होते. त्यातील एकीचा मृत्यू झाला तर एकीची सुटका करण्यात आली होती. या व्हिडीओनंतर तिच्या पालकांनीही एक व्हिडीओ जारी केला आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, लिरीची प्रकृती अत्यंत नाजूक असून मानसिक स्थितीही बिघडलेली आहे. सदैव खंबीर व आनंदी दिसणारी लिरी जिवंत आहे हे खूप आहे. तिचे जिवंत घरी येणे आता इस्रायल सरकारवर अवलंबून आहे. सरकारने सर्वच ओलिसांच्या सुटकेसाठी प्रयत्न करावेत.