पुणे- दिवाळीनंतर पुणे आणि मुंबई या शहरांमधील हवेची गुणवत्ता मोठ्या प्रमाणात ढासळल्याचे समोर आले आहे.विशेषतः पुणे शहरातील हडपसर भागातील हवा धोकादायक पातळीवर पोहचली आहे. यामुळे नागरिकांचे श्वसनाचे आजार बळावण्याचा धोका निर्माण झाला आहे.
दिवाळी निमीत्त पुणे शहर आणि परिसरात मोठ्या प्रमाणात फटाके फोडले जातात. याचा थेट परिणाम हवेच्या गुणवत्तेवर होतो. फटक्यांमुळे पुण्यात मोठ्या प्रमाणात हवा प्रदूषण झाले असून अनेक भागात हवेची गुणवत्ता धोकादायक पातळीवर पोहचली आहे. केंद्रीय प्रदूषण नियंत्रण मंडळाच्या आकडेवारीनुसार हवा गुणवत्ता निर्देशांक पुढीलप्रमाणे : शिवाजीनगर – २५४,भूमकरनगर – १७४,
सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ – २९८,कर्वे रस्ता – २०९, हडपसर – २८१, लोहगाव येथील म्हाडा कॉलनी – १५४ इतका झाला आहे.हवेच्या गुणवत्तेचा निर्देशांक जर १ ते १०० पर्यंत असेल तर हवेतील काही प्रदूषणकारी घटक त्रासदायक ठरू शकतात.पण तोच १०१ ते २०० दरम्यान निर्देशांक असल्यास मुले आणि ज्येष्ठांना श्वसनासाठी त्रास होऊ लागतो.२०१ ते ३०० या दरम्यान निर्देशांक असेल तर सर्वांनाच त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतात आणि ३०० पेक्षा जास्त असल्यास आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊ शकतात.