हजला जाण्यासाठी जल
वाहतूक पुन्हा सुरू करा

मुंबईतील चौघांचे पंतप्रधानांना पत्र

मुंबई:

मुस्लीम धर्मीयांमध्ये हज यात्रेला फार महत्त्व आहे. पूर्वी या यात्रेसाठी भारतातील यात्रेकरू समुद्र मार्गाने जात होते. मात्र, गेल्या काही वर्षांपासून समुद्र मार्ग बंद करण्यात आला असून, आता यात्रेकरूंना हजला जाण्यासाठी हवाई मार्गाचा उपयोग करावा लागत आहे. बंद झालेला समुद्र मार्ग पुन्हा सुरू केला जावा, यासाठी मुंबईतील चार मुस्लीम व्यक्तींनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना एक पत्र लिहिले आहे.
माहीम येथील रहिवासी – फारूख ढाला, सय्यद एम. इस्माईल, सय्यद गुलजार राणा आणि इरफान माचीवाला यांनी पंतप्रधान कार्यालय (पीएमओ) आणि महाराष्ट्र सरकारला पत्र लिहिले आहे. हज यात्रेकरूंसाठी मुंबई ते जेद्दाह हज आणि उमराह जहाज सेवा सुरू करण्याची मागणी या पत्राद्वारे करण्यात आली आहे. यावर्षी ३१ जानेवारी रोजी ई-मेल आणि स्पीड पोस्टाद्वारे पाठवले होते.
इरफान माचीवाला पत्रात लिहितात की “जहाज सेवा सुरू झाल्यास जेद्दाहला जाण्यासाठी यात्रेकरूंना फ्लाईटच्या तुलनेत खूपच कमी पैसे द्यावे लागतील. त्यामुळे एकूण खर्च कमी होईल. सध्या फ्लाईटच्या एका फेरीसाठी सुमारे ६२ हजार रुपये खर्च येतो. रमजानमध्ये याच फेरीसाठी ८० हजार ते एक लाख २५ हजार रुपयांपर्यंत खर्च येतो. मागणी आणि पुरवठ्याच्या गुणोत्तरानुसार खर्चाची आकडेवारी बदलते. फ्लाईट्स, निवास इत्यादींचा समावेश असलेली सध्या उपलब्ध असलेली हज पॅकेजेस प्रति व्यक्ती तीन लाख ते सहा लाख रुपयांच्या दरम्यान आहेत. त्यामुळे अनेकांना हजला जाता येत नाही. या पूर्वी केलेल्या शेवटच्या आकडेवारीनुसार, जल वाहतूक अधिक किफायतशीर ठरू शकते. जहाजाच्या तिकिटांची किंमत हवाई भाड्यापेक्षा 50 टक्के कमी असू शकते. त्यामुळे यात्रेच्या एकूण खर्चात फरक पडेल असे पत्रात नमूद केले आहे.

Scroll to Top