चंदीगड:- माजी केंद्रीय गृहराज्यमंत्री आणि मागासवर्गीय आयोगाचे अध्यक्ष हंसराज अहीर यांच्या पुतण्याचा मृतदेह पंजाबची राजधानी चंदीगड येथे आढळला. हंसराज अहीर यांचे बंधू हरिशचंद्र अहीर यांचा मुलगा महेश अहीर आणि त्याचा मित्र हरीश धोटे यांचे मृतदेह चंदीगड येथील कजेहडी गावाजवळील जंगलात झाडाला लटकलेल्या अवस्थेत आढळून आले आहेत. या घटनेमुळे चंदीगडसह महाराष्ट्रातही खळबळ उडाली आहे. दरम्यान, दोघांनीही आत्महत्या केली की त्यांची हत्या करण्यात आली अशी चर्चा सुरु झाली आहे.
चंदीगड येथील कजेहडी जंगलात २ युवकांचे मृतदेह झाडाला लटकलेल्या स्थितीत स्थानिक नागरिकांना आढळून आले होते. त्यांनतर स्थानिक परिसरात चांगलीच खळबळ उडाली होती. स्थानिक नागरिकांनी याबाबत चंदीगड सेक्टर ३६ च्या पोलिसांना माहिती दिली असता पोलिसांनी घटनास्थळ गाठत तपास सुरू केला. मृतकांमध्ये महेश अहिर व हरीश धोटे यांचा समावेश होता. हरीश व महेश हे दोघे जिवलग मित्र असल्याची माहिती मिळाली आहे.
हे दोघेही १४ मार्चपासून चंद्रपूरातून बेपत्ता होते. चंद्रपूर शहर पोलिसात अहिर कुटुंबाने तक्रार सुद्धा नोंदविली होती. मात्र, अचानक अशी घटना घडल्याने अहिर कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.