कराड- छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्वराज्याचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची जन्मभूमी असलेल्या कराड तालुक्यातील तळबीड गावात ग्रामस्थांनी काही कौतुकास्पद निर्णय घेतले आहेत.येथील ग्रामसभेत गावात अवैध दारूविक्री बंद करावी, तसेच गाव डीजेमुक्त करावे असे दोन ठराव महिला व ग्रामस्थांनी हात उंचावून बहुमताने मंजूर केले आहेत.हे ग्रामसभेचे नियम मोडणाऱ्यास १० हजार रुपये दंड आणि योग्य ती कायदेशीर कारवाई केली जाणार आहे.
तळबीड ग्रामपंचायत व ग्रामस्थांच्या या निर्णयाचे परिसरातून कौतुक होत आहे.तळबीडच्या सरपंच मृणालिनी मोहिते यांच्या अध्यक्षतेखाली ही ग्रामसभा झाली.प्रारंभी ग्रामविकास अधिकारी सुनील ढाणे यांनी प्रोसिडिंगचे वाचन केले. त्यानंतर महिला व ग्रामस्थांनी गावात सुरू असणाऱ्या अवैध दारूविक्री व विविध सण, समारंभात मोठमोठ्या आवाजाने लावल्या जाणाऱ्या डीजेच्या आवाजामुळे गावातील आबालवृद्धांना, ग्रामस्थांना होणाऱ्या त्रासाबाबतच्या तक्रारींचा पाढा वाचला.त्या वेळी या दोन्हींबाबतच्या निर्णयासाठी हात उंचावून मतदान घेण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यावेळी गावात अवैधरीत्या होणारी दारूविक्री बंद करणे तसेच गाव डीजेमुक्त करण्यासाठी हात उंचावून मतदान घेण्यात आले.