स्वारगेट शिवशाही बस अत्याचार प्रकरण सहमतीने झाले? आरोपी गाडेचा अटकेनंतर दावा

पुणे- पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता गाडे याची 70 तासानंतर काल मध्यरात्री पुणे पोलिसांनी शिरूर येथील गुनाट गावातून धरपकड केली. पोलिसांनी ताब्यात घेतल्यानंतर केलेल्या चौकशीत त्याने माझे चुकले, मी पापी आहे. असे म्हणत पश्चाताप व्यक्त केला. परंतु ’मी तरुणीवर अत्याचार केला नाही आमचे सहमतीने संबंध आले आहेत’, असा धक्कादायक दावा करत स्वतःचा बचाव करण्याचा प्रयत्न केला. त्याच्या या दाव्याची पोलीस पडताळणी करत आहेत. आपण आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्याचेही त्याने पोलिसांना सांगितले आहे. शिवाजीनगर येथील जिल्हा सत्र न्यायालयाने त्याला 12 मार्चपर्यंत पोलीस कोठडी दिली.

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकात तरुणीवर अत्याचार करून फरार झालेला आरोपी दत्ता गाडे याला शोधण्यासाठी काल पोलिसांचे पथक त्याच्या गुनाट या गावी गेले होते. तिथे उसाच्या फडात तो लपला असल्याची माहिती होती. स्थानिक गावकरी, ड्रोन आणि श्वान पथकाची मदत घेऊनही काल दिवसभरात त्याला पकडण्यात पोलीस पथकाला यश आले नव्हते. त्यानंतर रात्रीही पोलिसांनी आपले शोधकार्य सुरूच ठेवले होते. त्याला पकडण्यासाठी पोलिसांनी उसाच्या शेतात ड्रोनच्या मदतीने स्पीकरवरून त्याला शरण येण्याचे आवाहन केले होते. अखेर 70 तास पोलिसांना गुंगारा दिल्यानंतर सव्वा वाजताच्या सुमारास तो पोलिसांच्या हाती लागला. त्याला ताब्यात घेतल्यानंतर शिरूर येथून रात्री तीन वाजता पुण्यातील लष्कर पोलीस ठाण्यात आणले.
गाडेला पकडल्यानंतर पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पत्रकार परिषद घेतली. ते म्हणाले की, काल रात्री स्वारगेट डेपोतील बस अत्याचार प्रकरणातील आरोपीला गुनाट गावातून ताब्यात घेतले. गाडेच्या शोधासाठी एक विशेष पथक तयार करण्यात आले होते. तीन दिवसांपासून आमचे ऑपरेशन सुरू होते. स्वारगेट पोलीस स्टेशन, क्राईम ब्रँचचे अधिकारी आणि कर्मचारी या ऑपरेशनमध्ये सहभागी होते. 400 ते 500 स्थानिक नागरिकांचेही आम्हाला सहकार्य मिळाले. आरोपीला अटक करण्यात उशीर झाला. तीन दिवस लागले. पण पहिल्या दिवशी फिर्याद आल्यावर दीड ते दोन तासांत वेगवेगळ्या टीम कामाला लागल्या. एसटी स्टँडच्या आतील भागातील 23 सीसीटीव्ही कॅमेरे, तर बाहेरचे 48 कॅमेरे आम्ही तपासले. दीड ते दोन तासात आरोपीचे नाव कळले. त्यानंतर तांत्रिक पुरावा गोळा केला. त्याच दिवशी दुपारी दोन वाजताच्या सुमारास आमचे पथक गुनाट गावात पोहोचले होते. पूर्ण प्रयत्न करून आरोपी काल सापडला नाही. तो काल मध्यरात्री पकडला. त्यासाठी आम्हाला गावातील नागरिकांनी सहकार्य केले. आम्ही त्यांचे आभारी आहोत. आम्ही गावात भेट देऊन नागरिकांचा सत्कार करणार आहोत. ज्यांनी शेवटची महत्त्वाची माहिती दिली त्यांना 1 लाख रुपयांचे बक्षीस दिले जाणार आहे. आरोपीला कठोर शिक्षा देण्याचा आमचा प्रयत्न राहिल. तपास अजून सुरु आहे. सध्या आम्ही पुरावे तपासत आहोत. या प्रकरणात स्पेशल कौन्सिलची नियुक्ती होणार आहे. हा खटला फास्ट ट्रॅकमध्ये चालवला जाणार आहे. आरोपीची प्राथमिक आरोग्य तपासणी झाली आहे. त्याच्या गळ्यावर दोरीच्या काही खुणा आहेत. त्यामुळे आरोपीने आत्महत्येचा प्रयत्न केल्याचे दिसत आहे. दोरी तुटल्यामुळे आणि लोक जमा झाल्यामुळे आत्महत्या करता आली नाही, असे आरोपीने सांगितले आहे. आरोपीने खरेच आत्महत्येचा प्रयत्न केला होता का, याची शहानिशा करण्यासाठी घटनास्थळी तपास पथक पाठवण्यात येणार आहे.
पोलीस चौकशीत दत्ता गाडेने आपण गुन्हेगार आहोत, आपली चूक झाली, असे पोलिसांना रडत रडत सांगितले. परंतु तरुणीवर अत्याचार केला नसून, तिच्याशी सहमतीने संबंध झाल्याचा दावा केल्याचेही म्हटले. मात्र, त्यावर पोलिसांचा विश्वास नाही. आरोपी आपल्याला वाचवण्यासाठी हा दावा करत असावा, असा पोलिसांना संशय आहे.

गाडेला पकडल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की, आरोपी लपून बसलेला होता. पोलिसांनी वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा उपयोग करून त्याला शोधून काढले आहे. या संपूर्ण घटनेचा लवकरच पर्दाफाश होईल. त्यासंदर्भात पोलीस आयुक्तांनी माहिती दिली आहे. काही गोष्टी जाहीरपणे सांगणे योग्य नाही. योग्य स्तरावर तपास पोहोचला की, सगळी माहिती दिली जाईल. नेमका घटनाक्रम काय आहे, तो कसा घडला, याबाबत वेळ आल्यावर सगळी माहिती मिळेल.

गृह राज्यमंत्री योगेश कदम यांनी काल स्वारगेट बलात्कार प्रकरण जबरदस्तीने घडले नसल्याचे म्हटले होते. ही घटना घडली, तेव्हा शिवशाही बसच्या आजुबाजूला 10 ते 15 जण होते. पण तरुणीने प्रतिकार न केल्याने कुणालाही शंका आली नाही. त्यामुळे ही घटना घडली असे वक्तव्य केले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी टीकेची झोड उठवली.आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी त्यांची बाजू घेतली. परंतु संवेदनशीलता बाळगाण्याचा सल्ला दिला.

फडणवीस म्हणाले की, अशा प्रकरणाबद्दल बोलताना संवेदनशीलता बाळगली पाहिजे. बोलताना चूक झाली तर त्याचा थेट समाजमनावर परिणाम होतो. त्यामुळे मंत्री असो की लोकप्रतिनिधी, सर्वांनी संवेदनशीलतेने बोलावे, असा माझा सल्ला आहे. उबाठाचे खासदार संजय राऊत यांनी या प्रकरणावरून सरकारवर टीका केली. ते म्हणाले की, पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केली म्हणजे फार उपकार केले नाहीत. एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की, तिने स्ट्रगल केला नाही. असा शब्द त्यांनी वापरला म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत.

तर माजी विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार म्हणाले की, स्वारगेटमध्ये अत्याचार झाला आणि या मंत्र्यांच्या मते, त्या मुलीने विरोध केला नाही. म्हणजे या गुन्ह्याची जबाबदारी ते त्या पीडित मुलीवर ढकलत आहेत. विधान करताना मंत्र्यांनी थोडी तरी लाज बाळगली पाहिजे. आरोपीला क्लीनचीट देण्यासाठी मंत्र्यांची इतकी घाई का झाली आहे?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top