स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानकडून
यंदाही हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन

मुंबई – मुंबईच्या गिरगावमधील स्वामी विवेकानंद युवा प्रतिष्ठानने यंदाही हिंदू नववर्ष स्वागत यात्रेचे आयोजन केले आहे. या स्वागत यात्रेचे हे २१वे वर्ष आहे. ही यात्रा २२ मार्च रोजी गिरगाव येथे संपन्न होणार आहे. या वर्षीची यात्रा \’समर्थ भारत- विश्वगुरू भारत\’ या संकल्पनेवर आधारित आहे.
हिंदू नववर्ष स्वागत यात्रेची सुरुवात सकाळी ८ च्या सुमारास गिरगाव येथील फडके श्री गणेश मंदिरापासून गुढीच्या पूजनाने होणार आहे. यावर्षी आर्य चाणक्य यांच्या २२ फुटी मूर्तीच्या हातात मुख्य गुढी असणार आहे. पर्यावरण रक्षणाच्या पार्श्वभूमीवर मूर्तिकार योगेश इस्वलकर ही मूर्ती कागदाचा वापर करून बनवणार आहेत. मूर्तिकार प्रदीप मादुस्करांनी साकारलेली वैभवसंपन्न गणेशाची मुर्ती यात्रेच्या अग्रस्थानी असणार आहे. त्याचबरोबर विवेकानंद प्रतिष्ठानचा भारताचे शस्त्रास्त्र सामर्थ्य दाखवणारा चित्ररथ यात्रेचे खास आकर्षण असणार आहे. याशिवाय अनेक चित्ररथ यात्रेत सहभागी होणार आहेत. तसेच सुबक संस्कार भारती रांगोळ्या, पारंपरिक वेशभूषेत महिला दुचाकीस्वार या यात्रेची शोभा वाढवणार आहेत.

Scroll to Top