कुडाळ- सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीने स्मार्ट प्रीपेड मीटरच्या विरोधात तीव्र आंदोलनाचा इशारा दिला आहे. या पार्श्वभूमीवर १० फेब्रुवारी रोजी कुडाळ येथील महावितरण कार्यालयावर धडक मोर्चा काढण्यात येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वीज ग्राहक संघर्ष समितीची एक बैठक घेण्यात आली. या बैठकीत या मोर्चाची घोषणा करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी वीज ग्राहक संघर्ष समितीचे राज्य निमंत्रक कॉ. संपत देसाई होते. या बैठकीत कॉ. देसाई म्हणाले की, राज्य सरकारने स्मार्ट आणि प्रीपेड मीटर बसवण्याचे कंत्राट अदानी कंपनीला देऊन महावितरण अदानीच्या घशात घालण्याचा प्रयत्न चालविला आहे.नादुरुस्त आणि नवीन वीज जोडणीच्या नावाखाली लोकांना फसवून प्रीपेड मीटर बसवली जात आहेत. एक प्रकारे लोकांची लूट करण्याचा परवानाच सरकारने अदानीला दिला आहे. शिवसेना उबाठा गटाचे अतुल बंगे,अॅड.संदीप निंबाळकर,सत्यशोधक विद्यार्थी संघटनेचे राहुल कदम यांनी आपले विचार मांडले.