स्थानिक निवडणुकांबाबत मविआचा 8 दिवसांत निर्णय! शरद पवारांची माहिती

मुंबई- शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज मुंबईमध्ये पत्रकार परिषद घेतली. यावेळी त्यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत महत्त्वाचे वक्तव्य केले. ते म्हणाले की, इंडिया आघाडीत फक्त लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत चर्चा झाली होती. राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका एकत्र लढण्याबाबत कधीही ठरले नव्हते. आता राज्य आणि स्थानिक पातळीवर आघाडी करायची की नाही, याबाबत येत्या आठ ते दहा दिवसांत काँग्रेस आणि ठाकरे गटाशी चर्चा करून निर्णय घेऊ.
आगामी महापालिका निवडणुका उद्धव ठाकरे गटाने महाविकास आघाडीऐवजी स्वतंत्र लढण्याचे सूतोवाच केले आहे. ठाकरे गट स्वतंत्र लढल्यास आपला मार्गही मोकळा असेल, असे काँग्रेसने म्हटले आहे. तर दिल्ली विधानसभा निवडणूक आप आणि काँग्रेस एकमेकांविरोधात लढत आहेत. या संदर्भात शरद पवार यांना प्रश्न विचारण्यात आला असता ते म्हणाले की, येत्या 4 ते 5 महिन्यांत महापालिका निवडणुका लागतील, असे माझ्या वाचनात आले आहे. इंडिया आघाडीसाठी जेव्हा आम्ही एकत्र बसलो होतो, तेव्हा केवळ लोकसभा निवडणूक एकत्र लढविण्याबाबत चर्चा झाली होती. पण राज्य आणि स्थानिक पातळीवरील निवडणुका एकत्र लढण्याबाबतची चर्चा आमच्यात कधीही झालेली नाही. आता राज्याच्या बाबत आघाडी करायची की नाही, याबाबत येत्या आठ ते दहा दिवसांत काँग्रेस पक्षाचे प्रमुख, ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे, आमचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील आणि मी एकत्र बसून या सगळ्या गोष्टींचा विचार करून, इथे काही वेगळी भूमिका एकत्रित घेता येईल का, याबद्दल चर्चा करून निर्णय घेतील.
इंडिया आघाडीतील संवाद संपला आहे का? असा प्रश्न विचारण्यात आला असता शरद पवार म्हणाले की, अजिबात नाही, संवाद आहे. म्हणूनच मी सांगितले की, शक्य झाले तर आठ-दहा दिवसांत आम्ही बैठक बोलवत आहोत. मी स्वतः ही बैठक बोलवणार आहे.
शिर्डीत झालेल्या भाजपाच्या अधिवेशनात केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांच्यावर टीका केली होती. यावरून अमित शहा यांच्यावर जोरदार हल्लाबोल करत शरद पवार म्हणाले की, देशाच्या गृहमंत्रिपदी सरदार वल्लभभाई पटेल यांच्यासारखे नेते होते. यशवंतराव चव्हाणही गृहमंत्री होते. या पदाची प्रतिष्ठा आणि गरिमा वाढवण्यासाठी या थोर देशभक्तांनी मोलाचे काम केले. आपल्या शेजारचे राज्य गुजरातमध्ये अनेक प्रशासक होऊन गेले. अनेकांची नावे घेता येतील. या सगळ्या प्रशासकांचे वैशिष्ट्य होते की, यापैकी कुणालाही तडीपार केले नव्हते. आज त्या नेत्यांची मला आठवण होत आहे. तसेच आधीच्या काळात देशात वेगवेगळे पक्ष सत्तेत होते, पण राजकीय पक्षांतील नेत्यांत सुसंवाद होता. अमित शहा यांनी उद्धव ठाकरे यांच्याबाबत वक्तव्य केले, त्यावर उद्धव ठाकरे त्यांचे मत मांडतीलच. पण, जेव्हा हे गृहस्थ गुजरातमध्ये राहू शकत नव्हते, अन्‌‍ त्यांना मुंबईत आसरा देण्यात आला होता. तेव्हा बाळासाहेबांच्या घरी जाऊन सहकार्य करावे, अशी विनंती त्यांनी केली होती.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top