बडोदा – सिंधुदुर्ग जिल्ह्यात मालवण येथे उभारण्यात आलेला शिवाजी महाराजांचा पुतळा वाऱ्यामुळे कोसळला या घटनेवरून वाद सुरू असतानाच आता गुजरात मधील बडोदा येथे स्टॅच्यू ऑफ युनिटीकडे जाणारा मुख्य रस्ता पावसामुळे व येथे आलेल्या पुराच्या पाण्यामुळे उखडला आहे. या मार्गावर आता केवळ एकेरी वाहतूक सुरू आहे. त्यामुळे या रस्त्याच्या कामाबद्दल आता प्रश्नचिन्ह उपस्थित केला जात आहे. हा रस्ता ज्या प्रकारे तुटला आहे ते पाहता काही महिने तरी या रस्त्याच्या दुरुस्तीसाठी लागणार आहेत. दरम्यान या प्रकरणी काँग्रेसने पोस्ट लिहून सरकारवर खोचक टोला लागला आहे की, वेलकम टू स्टॅच्यू ऑफ युनिटी! या ठिकाणचा रस्ता म्हणजे एक भलमोठे कोडे बनला आहे. जर तुम्ही सुखरूप स्टॅच्यू ऑफ युनिटीपर्यंत पोहचू शकलात, तर तुम्हाला काही एक्स्ट्रा पॉईंट मिळतील.
पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जेव्हा गुजरातचे मुख्यमंत्री होते तेव्हा त्यांनी भारताचे लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांचा भव्य पुतळ्याचे २०१३ मध्ये भूमिपूजन केले होते. २०१८ मध्ये जगातील सर्वात मोठा भव्य पुतळा उभा राहिला होता. यासाठी २९८९ कोटी खर्च करण्यात आले आहेत. मात्र या ठिकाणचा रस्ता तुटल्याने, त्यामुळे हेच का मोदींचे गुजरात मॉडेल असा प्रश्न विरोधक करत आहेत.