एडीनबर्ग – स्कॉटलंड आणि आयर्लंडला इओवीन वादळाचा जबरदस्त तडाखा बसला आहे. ताशी १९० किलोमीटर वेगाने वाहणाऱ्या वाऱ्यांमुळे सुमारे २८ शहरांमध्ये मोठा विध्वंस झाला आहे. हवामान खात्याने २०११ नंतर पहिल्यांदाच सर्वाधिक धोक्याचा रेड अलर्ट जारी केला असून लोकांना आवश्यकता नसल्यास घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
इओवीन वादळामुळे देशभरातील रेल्वे, रस्ते आणि हवाई वाहतूक ठप्प झाली. खबरदारीचा उपाय म्हणून शाळा , महाविद्यालये बंद ठेवण्यात आली आहेत. बीबीसीच्या वृत्तानुसार या वादळाचा सर्वाधिक फटका आयर्लंडला बसला आहे. येथील सुमारे साडे सात लाख घरे आणि व्यापारी आस्थापनांचा वीज पुरवठा खंडित झाला आहे. उत्तर आयर्लंडमध्ये सुमारे २ लाख ८० हजार, स्कॉटलंडमधील १ लाख आणि वेल्समधील ५ हजार घरांचा वीजपुरवठा खंडित झाला आहे. या वादळामुळे हवामान खात्याने उत्तर आयर्लंडच्या सर्व सहा काउंटींसाठी रेड अलर्ट, उत्तर इंग्लंड आणि स्कॉटलंडच्या काही भागांसाठी ऑरेंज अलर्ट, पूर्व मिडलँडस्, इंग्लंडचा पूर्व भाग आणि लंडनसाठी यलो अलर्ट जारी केला आहे.