स्कायमेटच्या पाऊसमानाच्या अंदाजानंतर भारतीय हवामान खात्याची धावपळ

नवी दिल्ली – स्कायमेट या खासगी हवामान संस्थेने काल पावसाचा अंदाज जाहीर करताना यंदा सरासरी 94 टक्के पाऊस पडणार आहे असे जाहीर केले. हे वृत्त केवळ शेतकर्‍यांनाच नव्हे तर सर्वांनाच चिंतेत टाकणारे होते. त्यामुळे स्कायमेटच्या पाऊसमानाच्या अंदाजानंतर भारतीय हवामान विभागाकडून आज तातडीने पत्रकार परिषद घेण्यात आली. यामध्ये भारतीय हवामानशास्त्र विभागाने मान्सूनचा पहिला अंदाज जाहीर केला. यंदा देशात सामान्य पाऊस होईल असे सांगत जून ते सप्टेंबर 835 मिमी पाऊस म्हणजेच सरासरीच्या 96 टक्के पाऊस होणार आहे असे म्हटले. हवामान खात्याचा अंदाज खरा ठरला तर तो दिलासा ठरेल.
मात्र महाराष्ट्रात सरासरीपेक्षा कमी पाऊस राहणार असल्याचा अंदाजही हवामान खात्याने वर्तवल्याने राज्यातील शेतकरी चिंतेत राहणार आहेत.
भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी मान्सूनचा

अंदाज जाहीर केला. ते म्हणाले, यंदा देशात मान्सून साधारण म्हणजे 96 टक्के पडेल असा अंदाज आहे. आम्ही 1971 ते 2022 या मान्सून मॉडेलचा अभ्यास करून हा अंदाज वर्तवला आहे. प्रशांत महासागरात तयार होणार्‍या अल निनो व ला नीना या दोन प्रक्रियाचा भारतीय मान्सूनवर प्रभाव होतो. ला नीना पावसासाठी चांगली तर अल निनो पावसासाठी नकरात्मक आहे असे गृहीतक आहे. मात्र सध्या या दोन्ही परिस्थिती प्रशांत महासागरात नाहीत. ती परिस्थिती तटस्थ आहे. मात्र भारतात जुलैमध्ये अल निनो सक्रिय होत आहे. त्यामुळे पाऊस कमी पडेल असे काही लोक भाकीत करीत आहेत. असे असले तरी भारतीय समुद्री स्थिरांक व युरेशियन बर्फाळ प्रदेशातील आच्छादनाचा परिणाम भारतीय मान्सूनवर होतो. या दोन्ही परिस्थिती सकारात्मक आहेत. त्यामुळे जुलैनंतर पाऊस चांगला पडू शकेल.
पावसाच्या अंदाजानुसार देशभरातील शेतकरी आपले नियोजन करतात. त्यामुळे मान्सूनचे अंदाज अत्यंत महत्त्वपूर्ण मानले जातात. दरम्यान, स्कायमेट आणि भारतीय हवामान विभागाने वर्तवलेल्या अंदाजानुसार राज्यासह गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश येथे जुलै आणि ऑगस्ट या महिन्यांत तुलनेने कमी पाऊस पडण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि उत्तर प्रदेश या राज्यांमध्ये हंगामाच्या उत्तरार्धात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल.

राज्यात पुन्हा अवकाळीची शक्यता

आजपासून पुढील पाच दिवस राज्यात पुन्हा अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. राज्यातील काही भागांमध्ये गारपीटीची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्रासह मराठवाड्यात पुढील पाच दिवस अवकाळी पावसाची शक्यता हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे. तर 13 ते 15 एप्रिल यादरम्यान काही ठिकाणी गारपीट होण्याची शक्यता आहे. तर, विदर्भात काही ठिकाणी हलक्या पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top