रियाध – मुस्लिम धर्मातील उपासनेचा पवित्र महिना रमझान हा २२ किंवा २३ मार्चपासून सुरू होणार असून रमझानपूर्वी सौदी अरेबिया सरकारच्या इस्लामिक मंत्रालयाने एक मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. यामध्ये रमझानच्या काळात लाऊड स्पीकरद्वारे नमाज पठण आणि मशिदींमध्ये इफ्तार मेजवानीवर बंदी घालण्यात आली आहे. इस्लामिक मंत्रालयाने रमजानच्या निर्बंधांशी संबंधित १० सूचना जारी केल्या आहेत. तसेच रमझान दरम्यान मेजवानीसाठी देणगी मागण्यास मनाई आहे. जगातील अनेक इस्लामिक संघटनांनी या नवीन मार्गदर्शक तत्त्वांवर नाराजी व्यक्त केली आहे. दैनंदिन जीवनात इस्लामचा प्रभाव कमी करण्यासाठी हे करण्यात आले आहे, असे त्यांचे मत आहे.
नवीन सूचनांमध्ये म्हटले आहे की, नमाजासाठी लाऊडस्पीकरचा वापर केला जाणार नाही.रमझानमध्ये मेजवानी आयोजित करण्यासाठी देणगी मागण्यावर बंदी घालण्यात आली आहे.रमझानची मेजवानी मशिदीच्या आत दिली जाणार नाही,तर फक्त बाहेरील भागात दिली जाईल.या मेजवानीची देखरेख इमामच्या हातात असेल. संपूर्ण रमजान महिन्यात मशिदींमध्ये इमाम उपस्थित राहतील. खूप महत्वाचे असेल तेव्हाच ते रजा घेऊ शकतात. इमामांनी नमाज वेळेवर संपवावा,जेणेकरून इतर उपासकांनाही योग्य वेळ मिळेल. मुलांना मशिदीत नमाज अदा करण्यासही बंदी घालण्यात आली आहे.