मुंबई- सोलापूर लोकसभा निवडणुकीचे २०२४ चे सर्व अधिकार माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांना देण्याचा निर्णय काँग्रेसच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती आली आहे. राज्यातील आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मुंबईतील टिळक भवनात सोलापूर लोकसभा मतदारसंघाची काँग्रेसची बैठक पार पडली. यावेळी शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी मांडलेला ठराव एकमताने संमत करण्यात आला.
यावेळी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण, पृथ्वीराज चव्हाण, प्रदेश कार्याध्यक्षा आमदार प्रणिती शिंदे, उल्हास पवार आदी नेतेमंडळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की, राज्यात काँग्रेससाठी सध्या चांगलं वातावरण आहे म्हणून कोणीही गाफिल राहू नका. येत्या काही दिवसताच लोकसभा निवडणूक लागणार आहेत. या निवडणुकांच्या तयारीला लागा. महाराष्ट्रातील प्रत्येक लोकसभा मतदारसंघात समाजातील सर्व घटकांना सोबत घेऊन जनतेची कामे करा. संघटना मजबूत करा. संघटना मजबूत असेल तर आपल्याला कोणीही हरवू शकणार नाही. सोलापूर लोकसभेची जागा काँग्रेसची आहे आणि ती कोणाला सोडण्याचा प्रश्न येतच नाही, असेही त्यांनी सांगितले