छत्रपती संभाजीनगर- जगभरातील बौद्धांचे श्रद्धास्थान असलेल्या जिल्ह्यातील बौद्ध लेणीच्या पायथ्याशी मागील ६० ते ७० वर्षांपासून विपश्यना बुद्ध विहार व भिक्खु कुटी आहे.ही स्थळे अतिक्रमण असल्याचे ठरवून बेगमपुरा पोलिसांनी भारतीय न्याय संहितेच्या कलम १६८ प्रमाणे नोटीस बजावली. या निर्णयाच्या निषेधार्थ आंबेडकरी अनुयायी एकवटले आहेत.या पार्श्वभूमीवर सोमवार ७ ऑक्टोबरला लाखो बौद्ध अनुयायी अखिल भारतीय भीक्खु संघाच्या नेतृत्वात ‘बौद्धलेणी बचाव मोर्चा’ काढणार आहेत.
या बौद्धलेणी बचाव मोर्चात सर्व आंबेडकरी पक्ष संघटना गट तट विसरून सहभागी होणार असल्याने हा मोर्चा ऐतिहासिक होईल व किमान २ लाख लोक मोर्चात सहभागी होतील असा अंदाज भीक्खु संघाने व्यक्त केला आहे.हा मोर्चा क्रांतिचौक येथून निघून पैठण गेट,टिळक पथ, गुलमंडी, सिटीचौक,गांधी पुतळा शहागंज, हर्ष नगर विभागीय आयुक्त कार्यालय, छत्रपती संभाजीनगर येथे विभागीय आयुक्तांना निवेदन देऊन सभेद्वारे विसर्जित होणार आहे.भदंत विशुद्धानंद बोधी महास्थवीर हे मोर्चाचे नेतृत्व करणार असून राज्यभरातील बौद्ध भीक्खु या मोर्चात सहभागी होणार असल्याचे भन्ते संघप्रिय यांनी सांगितले. बौद्धलेणीच्या पायथ्याशी पायाभुत सुविधा निर्माण करण्यासाठी ५० एकर जागा देण्यात यावी.बौद्ध लेणी व परिसराचा समावेश बुद्धिस्ट सर्किट मध्ये करण्यात यावा.बौद्ध लेणी व परिसराचा पर्यटन स्थळ व तिर्थक्षेत्राच्या यादीत समावेश करण्यात यावा यासह अन्य मागण्या या मोर्चाच्या माध्यमातून करण्यात येणार आहे.