मुंबई- अभिनेता सैफ अली खान हल्ला प्रकरणातील आरोपी शरीफुलच्या पोलीस कोठडीत न्यायालयाने आज 29 जानेवारीपर्यंत 5 दिवसांची वाढ केली. या हल्ला प्रकरणात शरीफुलच्या वकिलांनी त्याची अटक आणि पुढील घडामोडींवर प्रश्न उपस्थित केले आहेत.
आज सैफ हल्ला प्रकरणातील आरोपी मोहम्मद शरीफुलला न्यायालयात हजर केले होते. न्यायाधीश कोमलसिंह राजपूत यांच्यासमोर पोलिसांनी सांगितले की, या प्रकरणी फॉरेनर ॲक्ट लावला आहे. आरोपी कसा आला आणि त्याने कागदपत्रे कशी मिळवली याची माहिती घ्यायची आहे.
त्याच्याकडून बॅग आणि चोरीचे साहित्य जप्त करायचे आहे. त्याने गुन्ह्यात वापरलेले शस्त्र आणि वापरलेले शूजबद्दल माहिती पाहिजे आहे. त्याने सिम कार्ड कसे मिळवले याबाबत माहिती दिली नाही. याशिवाय शरीफुल सोबत आणखी काही साथीदार असतील असा संशय आहे. त्यामुळे त्याची आणखी 7 दिवस पोलीस कोठडी द्या.
न्यायालयीन सुनावणीनंतर आरोपी शरीफुलचे वकील संदीप शेरखाने म्हणाले की, आरोपीची चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे पोलीस कोठडीची आवश्यकता नसल्याचे न्यायालयाला स्पष्ट सांगितले. आरोपीकडून हत्यार जप्त केले आहे, बोटाचे ठसे घेतले आहेत, सैफच्या घरी जाऊन चौकशी केली आहे, सिमकार्ड माहितीसाठी सीडीआर काढला तर सर्व माहिती मिळेल. त्यासाठी आरोपीची कोठडी आवश्यक नाही. पोलिसांनी दिलेले एकही कारण कोठडी वाढवून देण्यासाठी योग्य वाटत नाही. काही शोधायचे असेल तर आरोपीची आवश्यकता असते. परंतु, शस्त्र जप्त केल्यावर आरोपी सोबत असणे आवश्यक नाही, असा युक्तीवाद मी केला. या प्रकरणात पोलिसांनी सर्व चौकशी केली आहे. यात प्रसिद्ध व्यक्ती असल्यानेच केवळ न्यायालयाने पाच दिवसांची पोलीस कोठडी दिली आहे.
ॲड. शेरखाने यांनी त्यानंतर धक्कादायक माहिती देताना म्हटले की, आरोपीला अटक केल्यानंतर त्याच्या कुटुंबियांना ताबडतोब कळवले पाहिजे, पण या प्रकरणात त्याच्या कुटुंबाला माहिती दिली नाही. आरोपी घाबरला आहे. त्याने दावा केला आहे की तो सीसीटीव्हीतील व्यक्ती नाही, त्याला फसवले जात आहे. आरोपीने हा गुन्हा केला हे सिद्ध करणारा कोणताही पुरावा न्यायालयासमोर नाही. चेहरा, डोळे, नाक आणि आणि सीसीटीव्हीतील व्यक्ती यांच्यात काही साम्य नाही. त्यानंतर सैफच्या घरातील घडामोडीबद्दल सवाल उठवत ॲड. शेरखाने म्हणाले की, रात्री 2 च्या सुमारास हल्ला झाल्यानंतर तब्बल तासाभरानंतर पहाटे 4 वाजताच्या सुमारास सैफला रुग्णालयात दाखल केल्याची नोंद आहे. रुग्णालयात यायला इतका वेळ का लागला? हल्ला झाल्यानंतर सैफ किंवा करिनाने पोलिसांना 100 क्रमांकावर का कळविले नाही? त्यांच्या इमारतीच्या सुरक्षा रक्षकांना का कळवले नाही? सैफचा 11 व 12 व्या मजल्यावर दुमजली फ्लॅट आहे, मग संपूर्ण इमारतीत केवळ 6 व्या मजल्याचे सीसीटीव्ही का आहे? इतर कुठेही सीसीटीव्ही कसा नाही? पोलीस तपास सुरू झाल्यावर बोटांचे ठसे व इतर पुरावे गोळा करण्याकरिता कॉरिडॉर आणि त्यांचा फ्लॅट सील का केला नाही? आरोपीवर गुन्ह्यांत मदत केल्याचे कलम 109 नोंदवलेले नाही.
सैफचा जबाब
काल रात्री उशिरा पोलिसांनी सैफ अली खानचा जबाब नोंदवला. या जबाबात त्याने म्हटले की, 16 जानेवारीला रात्री 2:30 ते 2:40 च्या दरम्यान खूप आवाज ऐकू आला. मी 12 व्या मजल्यावर माझ्या खोलीत होतो, करीनाही माझ्यासोबत होती. आवाज ऐकून मी 11 व्या मजल्यावर खाली गेलो, जिथे माझी मुले आणि त्यांचे केअरटेकर एकत्र राहतात. मी पाहिले की, जहांगीरच्या खोलीतून आवाज येत आहे. जेव्हा मी तिथे पोहोचलो तेव्हा मी पाहिले की, जहांगीरचा केअरटेकर आणि एका अनोळखी व्यक्तीमध्ये जोरदार बाचाबाची सुरू होती. त्या माणसाकडे चाकू होता, माझ्या मुलाच्या जीवाला धोका होता, म्हणून मी काहीही विचार केला नाही आणि त्याला पकडण्याचा प्रयत्न केला. मी काही वेळ त्याला धरून ठेवले, पण अचानक त्याने माझ्यावर चाकूने हल्ला केला. माझ्या पाठीवर, मानेवर व हातावर वार केले. केअरटेकर माझ्या मुलासह खोलीतून बाहेर पडताच मी हल्लेखोराला त्याच खोलीत बंद केले. खूप रक्त येत होते, करीना आणि मुले घाबरली होती. त्यानंतर मला रुग्णालयात दाखल केले.
लिलावती रुग्णालयातील वैद्यकीय अहवालात नमूद केले आहे की, अभिनेता सैफ अली खानवर पाच ठिकाणी वार केल्याच्या जखमा होत्या. त्याच्या पाठीला, मनगटाला, मानेला, खांद्याला आणि कोपराला दुखापत झाली. जखमांचा आकार 0.5 सेमी ते 15 सेमी पर्यंत होता. सैफचा मित्र अफसर झैदीने ऑटो रिक्षातून त्याला पहाटे 4:11 वाजता लिलावती रुग्णालयात आणले. (डॉक्टरांनी सैफसह त्यांचा पुत्र तैमूर असल्याचे म्हटले आहे. पण सैफचा जबाब आणि वैद्यकीय अहवालातील नोंद यात कुठेही तैमूरचा उल्लेख नाही. मग डॉक्टरांनी तैमुरचे नाव का घेतले आणि रक्तबंबाळ असलेल्या सैफने आपल्या आठ वर्षांच्या मुलाला सोबत का नेले? हे प्रश्न निर्माण होतात.) या अहवालात कुठेही चाकूचा उल्लेख नाही. सैफच्या घरापासून रुग्णालय फक्त 10-15 मिनिटांवर आहे. पण हल्ल्याची आणि त्याला रुग्णालयात दाखल करण्याची वेळ पाहता त्याला तब्बल 1 तास 41 मिनिटांनी रुग्णालयात आणले. सैफवर जीवघेणा हल्ला झाला होता तर त्याला रुग्णालयात दाखल करण्यास एवढा उशीर का झाला? असा प्रश्न आहे.
सैफ तासाभराने रुग्णालयात गेला! मित्र सोबत होता! तैमूरचे नाव का घेतले?
