मुंबई – सिनेअभिनेता सैफ अली खानवर झालेल्या हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी त्याची पत्नी करिना कपूर-खान हिचा जबाब नोंदवला. करिनाने या जबाबात सांगितले की, सैफवर हल्ला करणार्या हल्लेखोराने घरातून काही चोरले नाही. दागिने समोर पडले असूनही चोरट्याने त्याला हात लावला नाही. करिनाच्या या जबाबामुळे चोरीचा हेतू नव्हता हे स्पष्ट झाल्याने सैफवरील हल्ल्याचे गूढ आणखी वाढले आहे. मुंबई पोलिसांनी या प्रकरणी आज दीपक कनोजिया नावाच्या आणखी एका संशयिताला छत्तीसगडच्या दुर्ग येथून अटक केली असे कळते.
करिनाने जबाबात सांगितले की, त्या रात्री नॅनीचा आरडाओरड ऐकून मी आणि सैफ तिकडे धावलो. जिथून आवाज येत होता तेथेच मुलगा झोपला असल्याने भिती वाटली. नॅनीच्या खोलीत पोहोचताच सैफने सर्वांना 12व्या मजल्यावर पाठविले. त्यानंतर 11व्या मजल्यावर सैफ आणि हल्लेखोर दोघेच होते. हल्लेखोर मुलगा जहांगीरच्या दिशेने गेला तेव्हा सैफने त्याला अडविले. त्यावेळी सैफ आणि हल्लेखोरात झटापट झाली. हल्लेखोर खूपच आक्रमक होता. त्याचे वय अंदाजे 35 ते 40 असेल. त्याने सैफवर 6 वार केले. मात्र त्याने कोणतीही मौल्यवान वस्तू चोरली नाही. अज्ञात व्यक्ती घरात चाकू घेऊन शिरल्याने मी घाबरले होते. मी खूप तणावात होते. त्यामुळे माझी
बहीण करिश्मा कपूर मला तिच्या घरी घेऊन गेली. हल्लेखोराने घरातून कोणतीही चोरी केली नाही. दागिने समोर पडले असूनही चोरट्याने त्याला हात
लावला नाही.
करिना कपूरच्या या जबाबामुळे सैफवरील हल्ला चोरीसाठी नसेल तर नेमक्या कोणत्या कारणासाठी झाला, यामागे खंडणी किंवा अपहरण हा हेतू होता का, असे प्रश्न पुन्हा उपस्थित झाले आहेत. दरम्यान, हल्ल्यानंतर आज तिसर्या दिवशीही हल्लेखोराचा शोध सुरूच होता. हल्लेखोराचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. या व्हिडिओत हल्लेखोर दादरमधील एका दुकानातून हेडफोन खरेदी करताना दिसत आहे. त्यानंतर तो कुठे गेला, याचा शोध सुरू आहे. तो गुजरातच्या दिशेने गेला असेही सांगितले जात होते. मुंबई पोलिसांची 35 पथके हल्लेखोराचा शोध घेत असून, संपूर्ण मुंबईतील सीसीटीव्ही फुटेज तपासले जात आहेत. मात्र आरोपी सातत्याने पोलिसांना गुंगारा देत आहे. सैफवर हल्ला करणारा आरोपी वांद्रे रेल्वे स्थानकातून लोकल किंवा एक्स्प्रेस पकडून मुंबईच्या आसपास किंवा गुजरातला गेल्याचाही संशय मुंबई पोलिसांना आहे.
दरम्यान, लीलावती रुग्णालयातील डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार, सैफच्या प्रकृतीत आता सुधारणा होत आहे. त्याला विशेष रूममध्ये हलवण्यात आले आहे. त्याला मंगळवारी 21 जानेवारीला डिस्चार्ज मिळू शकतो, असे सांगण्यात येत आहे. सैफचे रुग्णालयाचे कथित बिल आज व्हायरल झाले . बिलवरून दिसते की त्याने निवा बुपा कंपनीचा 35.95 लाख रुपयांचा विमा काढला होता. त्यापैकी रुग्णालय खर्चासाठी आतापर्यंत 25 लाख रुपये मंजूर करण्यात आले आहेत. विमा कंपनीने म्हटले आहे की, सैफला रुग्णालयात दाखल करण्यापूर्वी आम्हाला कॅशलेस प्री – अॅथोरायझेशनची विनंती करण्यात आली होती. त्यानुसार आम्ही उपचार सुरू करण्यासाठी सुरुवातीची रक्कम मंजूर केली. पूर्ण उपचारानंतर आम्हाला अंतिम बिल मिळेल तेव्हा आम्ही अटी-शर्तीनुसार दावा मंजूर करू.
हल्लेखोराला तैमूरला मारायचे होते
आमदार जितेंद्र आव्हाड यांचा दावा
सैफ अली खानवर हल्ला करणार्या आरोपीला सैफला नव्हे तर त्याचा मुलगा तैमूरला ठार मारायचे होते, असा खळबळजनक दावा शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. जितेंद्र आव्हाड यांनी एक्स पोस्ट मध्ये म्हटले की, प्राणघातक हल्ल्यातून सैफ अली खान हा नशिबाने बचावला. खरे तर मुलाचाच बळी जाणार होता. मात्र, नशिबाने तोही वाचला. पण, सत्य बोलण्यास कोणीच धजावत नाही. बाळ जन्माला आले तेव्हा त्याचे नाव तैमूर ठेवण्यात आले. तेव्हापासून सोशल मीडियाच्या माध्यमातून कट्टरपंथीय या बाळाच्या मागे लागले. कहर म्हणजे या बाळाचे तैमूर हे नाव तैमूरलंग या मंगोल आक्रमकाशी जोडले. तैमूर हे नाव पौराणिक आहे. त्याचा अरेबिक अर्थ आहे, लोखंडासारखा कणखर विचारांचा आणि जे काम हाती घेतले आहे, त्या कामाच्या पूर्ततेसाठी ध्यास बाळगणारा! त्यातूनच सैफ आणि करिना यांनी आपल्या बाळाचे नाव तैमूर ठेवले. हे नाव जाहीर झाल्यापासूनच तो कट्टरपंथीयांचा लक्ष्य झाला. त्याचे नाव तैमूरलंगशी जोडणे ही विकृतीच आहे. कल्पनेच्या पलिकडे लहान मुलाची नावावरून कुणाशी तरी तुलना करून त्यास दूषणे लावली जात असतील, द्वेष पसरवत असतील तर सर्वच अवघड आहे.