मुंबई – काल मध्यरात्री मुंबई साखरझोपेत असताना उच्चभ्रूच्या वांद्रे परिसरातील बॉलिवूड अभिनेता सैफ अली खान याच्या ‘सद्गुरू शरण’ इमारतीतील 12 व्या मजल्यावरील राहत्या घरी चोर शिरला. या चोराने सैफच्या घरी कामाला असलेली मदतनीस लीमा हिच्यावर हल्ला केला. तिला वाचवण्यासाठी गेलेल्या सैफवरही चाकूने हल्ला करीत त्याला गंभीर जखमी केले. सैफच्या पाठीच्या मणक्यात अडीच इंचाचा चाकूचा भाग खुपसलेला होता. त्याच्या हाताला आणि मानेला जखमा झाल्या होत्या. हा हल्ला केल्यानंतर हा चोर पायर्या उतरत इमारतीखाली आला आणि पसार झाला. सैफला लीलावती रुग्णालयात नेण्यात आले. त्याच्यावर ताबडतोब 2 शस्त्रक्रिया झाल्या असून, त्याची प्रकृती स्थिर आहे. पोलिसांच्या 15 टीमने 24 तास शोध घेतल्यानंतरही हा चोर सायंकाळपर्यंत सापडलेला नव्हता. त्याचा फोटो आणि व्हिडिओ सहाव्या मजल्यावरील सीसीटीव्हीमध्ये कैद झालेला होता तो पोलिसांनी समाजमाध्यमांपर्यंत अलगद पोहोचवला.
सैफवर जीवघेणा हल्ला करणारा हा अज्ञात व्यक्ती चोरी करण्यासाठी आला होता असा खुलासा पोलिसांनी स्वत: केला. क्राईम ब्रँचचे डीसीपी गेडाम दीक्षित यांनी स्वत:ही अफलातून माहिती दिली. पोलिसांनी हा दावा केला असला तरी साधी चोरी करण्यासाठी एक तरुण सैफ अली खानसारख्या मान्यवराच्या घरी शिरतो आणि आरामात जिने उतरत पळून जातो हे पटण्यासारखे नाही. सैफ अली खान ज्या इमारतीत राहतो त्या इमारतीभोवती कडक सुरक्षा व्यवस्था असणार हे उघड आहे. प्रत्येक मजल्यावर सीसीटीव्ही असणार हेही उघड आहे. असे असताना एक चोर शेजारच्या इमारतीच्या भिंतीवरून उडी मारून सैफच्या इमारतीत प्रवेश करतो, त्यानंतर तो 12 व्या मजल्यापर्यंत पोहोचतो, सैफच्या घरात प्रवेश करतो हे सर्व अनाकलनीय आहे. सैफच्या घराचे दार पहाटे 2 वाजता सताड उघडे होते का? हा चोर घरात कसा शिरला? तो इमारतीत कसा शिरला? त्यावेळी इमारतीचे सुरक्षारक्षक झोपलेले होते का? या चोराने सैफवर हल्ला केल्यानंतर इमारतीत कोणतीही आरडाओरड झाली नाही का? हल्ला केल्यानंतर हा चोर पायर्या उतरत 12 मजले खाली येईपर्यंत सुरक्षारक्षकांना सतर्क करण्यात आले नाही का? हे सर्व प्रश्न अनुत्तरीत आहेत. पोलिसांनी संध्याकाळी एका माणसाला ताब्यात घेतल्याचे सांगितले गेले. मात्र हा तोच अज्ञात ग्रहस्थ आहे याची खात्री देता आली नाही.
काल अभिनेत्री करीना कपूर खान, तिची बहीण करीश्मा कपूर, निर्माती रेहा कपूर आणि सोनम कपूर यांच्याबरोबर पार्टीला गेली होती. ती रात्री दीड वाजता घरी परत आली. घरात आली तेव्हा तिने एका व्यक्तीला हॉलमध्ये पाहिले. त्याला पाहताच करीना घाबरली. तिने आरडाओरड केली. तिच्या ओरडण्याचा आवाज ऐकून त्यांची मदतनीस एरीयामा लिमा बाहेर आली. तोच चोराने लिमावर हल्ला केला. चोर लिमावर हल्ला करायला गेला तेव्हाच करीना तैमूरला घेऊन बेडरूमच्या दिशेने पळाली.
सैफ बेडरूममध्ये होता. घरातील आरडाओरडा ऐकून सैफ बेडरूममधून पळत बाहेर आला. तेव्हा मदतनीस लिमा आणि चोराची झटापट सुरू होती. या झटापटीत लीमाच्या हाताला चाकू लागला होता. सैफ तिला वाचवायला गेला तेव्हा चोराने सैफच्या हातावर, पाठीवर चाकूने हल्ला केला. या हल्ल्यात सैफ गंभीर जखमी झाला. चोराने सैफवर सहा वार केले. त्यात त्याच्या गळ्याला आणि पाठीच्या मणक्यावर गंभीर इजा झाली. आणखी दोन जखमा इतक्या गंभीर नाहीत आणि दोन जखमा खरचटल्यासारख्या आहेत. हा हल्ला करून चोर मुख्य दरवाजातून बाहेर आला आणि पायर्या उतरत खाली येऊन पळून गेला. ही घटना पहाटे 2 ते 2.30 च्या दरम्यान घडली. चोराचे 2.40 वाजता पायर्या उतरतानाचे सहाव्या मजल्यावरचे सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध आहेत. मात्र ज्या 12 व्या मजल्यावर हा हल्ला झाला त्या 12 व्या मजल्यावरील सीसीटीव्ही फुटेजबाबत पोलीस अवाक्षर बोलायला तयार नाहीत. या घटनेची माहिती मिळताच सैफचा मुलगा इब्राहिमने सैफला रात्री दोन वाजता रिक्षातून लिलावती रुग्णालयात नेले. याबाबतही संभ्रम आहे. सैफला इब्राहिमने रुग्णालयात नेले की करीनाने रुग्णालयात नेले हेही पोलीस सांगायला तयार नाहीत.
पोलिसांना हल्ल्याची माहिती मिळताच, त्यांनी सैफच्या घरी जाऊन तत्काळ चौकशी सुरू केली. गुन्हेगाराला शोधण्यासाठी गुन्हे शाखेचे 8 पथक आणि पोलिसांची 7 पथके नेमली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेज ताब्यात घेतले आहे. पोलिसांनी घरातील सर्व नोकरांचे मोबाईल फोन ताब्यात घेतले. घरात रिनोव्हेशनचे काम करणार्या चार कर्मचार्यांना ताब्यात घेतले, त्याचबरोबर त्यांचे फोन देखील ताब्यात घेतले. मदतनीस लिमा हिच्या तक्रारीनंतर बांद्रे पोलीस ठाण्यात आरोपीविरोधात गुन्हा दाखल केला.
सैफवर लिलावती रुग्णालयात डॉ. नितीन डांगे यांनी प्रथम न्यूरोसर्जरी करून सैफच्या मणक्यात अडकलेला चाकूचा अडीच इंचाचा तुकडा बाहेर काढला. त्यानंतर मानेवर आणि हातावर डॉ. लीना जैन यांनी प्लास्टिक सर्जरी केली. सैफ सध्या अतिदक्षता विभागात आहे. त्याच्यावर न्यूरोसर्जन नितीन डांगे, कॉस्मेटिक सर्जन लीना जैन आणि निशा गांधी या डॉक्टरांनी उपचार केले. न्यूरोसर्जन नितीन डांगे म्हणाले, सैफ अली खानला मध्यरात्री दोन वाजताच्या सुमारास रुग्णालयात दाखल केले होते. सैफच्या मणक्याला जबर दुखापत झाली होती. त्याच्या मणक्यात चाकूचा तुकडा घुसला होता. तो तुकडा काढण्यासाठी आम्ही सर्जरी केली आणि स्पायनल फ्लुएडचे लीकेज थांबवण्यासाठी उपचार करण्यात आले. त्याच्या डाव्या हातावर दोन खोलवर जखमा होत्या. त्याचसोबत मानेवरील जखमेवर प्लास्टिक सर्जरी करण्यात आली. सैफची प्रकृती आता स्थिर आहे. तो उपचारांना चांगला प्रतिसाद देत असून, त्याच्या प्रकृतीला आता धोका नाही.
रात्री उशिरापर्यंत पोलिसांचा तपास सुरू होता. मात्र आरोपीला अटक करण्यात त्यांना यश आले नाही. तसेच चोर घरात कसा शिरला आणि कसा पळाला? याची पटेल अशी कोणतीही माहिती त्यांना देता आली नाही. घरातील कर्मचार्यांनी चोराला घरात घेतल्याचा संशय व्यक्त होत होता. त्याबद्दलही पोलिसांनी काहीही सांगितले नाही. क्राईम ब्रँचचे एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक यांना खास पाचारण करण्यात आले होते. उपायुक्त दत्ता नलावडेही उपस्थित होते. सैफ अली खानवरील हा हल्ला निव्वळ चोरीचा असू शकतो याची शक्यता कमी असून, मूळ कारण लपवले जात आहे, असाच संशय आहे.
सैफचा हल्लेखोर साधा चोर? पायर्या उतरत पळाला? पोलिसांचा खुलासा कुणालाच पटणारा नाही
