सातारा – सातारा जिल्ह्यातील ठोसेघर-सज्जनगड परिसरातील बोरणे घाटात एक युवती डोंगराच्या कडेला सेल्फी काढत असताना तोल जाऊन २५० फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती ४० फुटावरच एका झाडीत अडकली. तिला महाबळेश्वर टेकर्स व शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमने सुरक्षित बाहेर काढून साताऱ्यातील एका खाजगी हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.
सातारा जिल्ह्याच्या पूर्वेकडील खटाव तालुक्यातील पाच मुले व दोन मुली या ठोसेघर सज्जनगड परिसरात सहलीसाठी आले होते. काल सायंकाळी चार ते पाच वाजण्याच्या सुमारास ठोसेघरकडे जाताना सज्जनगडापासून ५०० मीटर अंतरावर त्यांच्यातील एक तरुणी व तरुण रस्त्याच्या दरीच्या बाजूला सेल्फी काढत होते. सेल्फी काढताना तरुणीचा तोल जाऊन ती अडीचशे फूट खोल दरीत कोसळली. सुदैवाने ती या दरीत चाळीस फूट अंतरावर झाडीत अडकली.
तरुणी दरीत कोसळल्याची माहिती तरुणीच्या मित्रांनी सातारा तालुका पोलीस ठाण्यात कळवली. पोलिसांना ही माहिती कळताच त्यांनी शिवेंद्रराजे रेस्क्यू टीमला मदतीसाठी पाचारण केले. ही टीम क्षणाचाही विलंब न लावता घटनास्थळी दाखल झाली. तोपर्यंत महाबळेश्वर रेस्क्यू टीमही दाखल झाली. या परिसरात मुसळधार पाऊस असल्याने दरीत उतरणे अवघड होत होते. मात्र, दोराच्या साह्याने ट्रेकरनी दरीत उतरून या तरुणीला बाहेर काढले. दरीतून बाहेर काढल्यानंतर जखमी झालेल्या तरुणीला उपचारासाठी साताऱ्यातील खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले.