सॅनिटरी पॅडच्या गोण्यांमधून विदेशी दारूची तस्करी! १९ लाखांचा मुद्देमाल जप्त, दोन जण अटकेत

धुळे – सॅनिटरी पॅडच्या गोण्यांमधून विदेशी दारूची तस्करी करत असल्याच्या धक्कादायक प्रकार उघडकीस आला. गोवा राज्यातून धुळे मार्गे गुजरातला जाणाऱ्या ट्रकमधून लाखो रुपयांचा बियर व दारू साठा जप्त करण्यात आला. धुळे पोलिसांच्या सतर्कतेने दोन तस्करांना ताब्यात घेतले असून त्यांना या प्रकरणी अटक करण्यात आली.

गोव्यातून धुळे मार्गे गुजरातमध्ये मोठा मद्यसाठा जात असल्याची गोपनीय माहिती धुळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांना मिळाली. त्यानंतर त्यांनी तातडीने मुंबई -ग्रा महामार्गावरील आवधान शिवारात सापळा रचत संशयित ट्रकला थांबवून त्यातील मालाबाबत चौकशी केली. यावेळेस ट्रकमधील चालकाने आतमध्ये सॅनिटरी पॅडने भरलेल्या गोण्या असल्याचे सांगितले. मात्र, पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकमधील मालाची तपासणी केली. यावेळी त्यांना सॅनिटरी पॅडच्या गोण्यांखाली मोठ्या प्रमाणात बियर व विदेशी दारूचा साठा आढळून आला. ट्रकमधून ७,८१,८०० रुपये किमतीचे विदेशी दारूचे तब्बल २०५ खोके, ५२ ८०० रुपये किमतीचे बियरचे २० खोके, १२,००० रुपये किमतीच्या सॅनिटरी पॅडच्या १०० गोण्या व १० लाख रुपये किमतीचा आयशर ट्रक, असा एकूण १९,४४,६०० रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. धुळे स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने केलेल्या या कारवाईचे धुळे जिल्हा पोलीस अधिक्षक संजय बारकुंड यांनी कौतुक केले असून या प्रकरणी अर्जून रामजीत बिंद व सोमनाथ नाना कोळी या दोघांवर मोहाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top