सुप्रीम कोर्टाचे सीबीआयवर कडक ताशेरे केजरीवालना कैदेत ठेवण्यासाठीच अटक केलीत

नवी दिल्ली – कथित दिल्ली मद्य घोटाळ्याप्रकरणी गेले 156 दिवस कैदेत असलेले दिल्लीचे आपचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना आज सर्वोच्च न्यायालयाने अखेर नियमित जामीन मंजूर केला! हा जामीन मंजूर करताना न्यायाधीश उज्जल भूयान यांनी सीबीआयवर अत्यंत कडक शब्दात ताशेरे ओढले. ते निकाल देताना म्हणाले की, केजरीवाल यांना तुरुंगात डांबून ठेवण्याच्या एकच उद्देशाने सीबीआयने त्यांना अटक केली, सीबीआय म्हणजे पिंजर्‍यात कोंडलेला पक्षी आहे.
सर्वोच्च न्यायालयाचे न्या. उज्जल भुयान आणि न्या. सूर्यकांत यांच्या खंडपिठासमोर केजरीवाल यांच्या जामिनाबाबतच्या दोन याचिकांवरील सुनावणी 5 सप्टेंबर रोजी पूर्ण झाली होती. मात्र न्यायालयाने निकाल राखून ठेवला होता. आज तो निकाल न्यायालयाने दिला. एका याचिकेद्वारे केजरीवाल यांनी सीबीआयने केलेल्या अटकेला आव्हान दिले होते. तर दुसर्‍या याचिकेद्वारे जामिनाची विनंती केली होती. त्यापैकी अटकेला आव्हान देणार्‍या याचिकेवर दोन न्यायाधीशांमध्ये एकमत झाले नाही. न्या सूर्यकांत यांनी अटक वैध असल्याचे मत नोंदविले. तर न्या. भुयान यांनी सीबीआयने अटक हेतुपुरस्सर करण्यात आली असे मत व्यक्त करून सीबीआयवर ताशेरे ओढले. जामीन मंजूर करण्याचा निर्णय मात्र दोन्ही न्यायाधीशांनी एकमताने दिला. मात्र जामीन देताना न्यायालयाने पूर्वीच्या अटी कायम ठेवल्या आहेत. मुख्यमंत्री कार्यालयात जायचे नाही, कोणत्याही फाईलवर मुख्यमंत्री या नात्याने सही करायची नाही, खटल्यातील साक्षीदारांशी संपर्क साधायचा नाही आणि खटल्याविषयी कोणतीही जाहीर टिप्पणी करायची नाही या अटी आहेत. पण केजरीवाल यांना निवडणूक प्रचार करण्यास मुभा दिली आहे.
न्या. भुतान यांनी आज निकाल देताना सीबीआयवर ताशेरे ओढत म्हटले की अंमलबजावणी संचलनालयाच्या (ईडी) खटल्यात केजरीवाल यांना जामीन मंजूर होताच सीबीआय सक्रिय झाली. केवळ केजरीवाल यांना तुरुंगाबाहेर पडता येऊ नये या उद्देशाने सीबीआयने त्यांना अटक केली. त्याआधी 22 महिने त्यांना अटक करण्याची सीबीआयला आवश्यकता वाटली नाही.सीबीआयचे हे वागणे संशयास्पद आहे.आपण एक स्वायत्त संस्था आहोत हे केवळ बोलण्यातून नव्हे तर आपल्या प्रत्येक कृतीतून सीबीआयने दाखवून दिले पाहिजे. अशाप्रकारे कोणाच्यातरी दबावासमोर झुकून कोणालाही अटक केली जाऊ नये. सीबीआयची प्रतिमा ‘पिंजर्‍यातला पोपट’ अशी झाली आहे. ती सुधारण्याचा प्रयत्न सीबीआयने केला पाहिजे. आपल्या प्रत्येक कृतीतून तसे ते दिसेल याची दक्षता सीबीआयने घेतली पाहिजे’. अशा परखड शब्दात न्या. भुयान यांनी आपले मत नोंदविले. भरपावसात आज सांयकाळी तुरुंगातून बाहेर येताच केजरीवाल यांनी आपल्या कार्यकर्त्यांना सांगितले की, ‘लोकांच्या आशीर्वादामुळे मी तुरुंगातून बाहेर आलो आहे. मी ताकद 100 टक्क्यांनी वाढली आहे. मी देश विरोधी शक्तीविरोधात लढत राहील. हा षडयंत्रावर विजय आहे. मी देवाचे आभार मानतो. मी जीवनभर लढत राहील. पुढेही लढत राहील’.
आपचे नेते भाजपावर बरसले
केजरीवाल यांना जामीन मंजूर होताच आपच्या कार्यकर्त्यांमध्ये आनंदाची लाट उसळली.आपचे नेते, कार्यकर्त्यांनी न्यायालयाच्या निर्णयाचे जल्लोषात स्वागत केले. दिल्लीचे माजी उपमुख्यमंत्री मनीष सिसोदिया आणि संजय सिंह यांनी केजरीवाल यांना नाहक तुरुंगात डांबून ठेवल्याबद्दल भाजपावर कडाडून टीका केली. हा निकाल केवळ केजरीवाल आणि आपसाठीच महत्वाचा नाही. सर्वसामान्य भारतीयांसाठी तो महत्वाचा आहे.कोणी कितीही हुकूमशाही करण्याचा प्रयत्न केला. ईडी, सीबीआयसारख्या संस्थांचा गैरवापर करून दाबण्याचा प्रयत्न केला तरी या देशाचे संविधान सर्वसामान्यांचे रक्षण करण्यास सक्षम आहे, असा सकारात्मक संदेश त्यामुळे जनतेमध्ये गेला आहे. सीबीआय पिंजर्‍यातल्या पोपटाप्रमाणे वागते असे खुद्द न्यायालय म्हणाले आहे. याची लाज सीबीआय आणि भाजपाला वाटली पाहिजे. सीबीआयने केजरीवाल यांना केवळ भाजपाची तशी इच्छा होती म्हणून अटक केली होती. भाजपाने देशाची माफी मागितली पाहिजे अशा शब्द सिसोदियांनी भाजपावर निशाणा साधला. आप नेते संजय सिंह म्हणाले की, हा संपूर्ण खटला असत्यावर आधारित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच त्याचे सूत्रधार आहेत.

लोकशाहीचा पाया भक्कम आहे-शरद पवार
केजरीवाल यांच्या जामिनाबद्दल ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी समाधान व्यक्त केले. केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून एक गोष्ट स्पष्ट झाली की देशात लोकशाहीचा पाया आजही भक्कम आहे. इतक्या दिवसांचा लढा आज सत्याच्या मार्गाने निघाला. अधम मार्गाने एखाद्याला नामोहरम करण्याचा कट लोकशाही बुलंद असणार्‍या देशात कधीच यशस्वी होणार नाही, अशी भावना केजरीवाल यांना मिळालेल्या जामिनातून पक्की झाली,असे पवार यांनी आपल्या एक्स पोस्टमध्ये म्हटले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top