सुप्रियाविरोधात सुनेत्राला लढवले ही चूक नको ते झाले! अजित पवारांना पश्‍चाताप

मुंबई – उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष अजित पवार यांनी धरणाच्या बाबतीतील वक्तव्यावर जाहीर माफी मागितली होती. त्यानंतर त्यांनी आज पुन्हा एकदा चूक केल्याची कबुली दिली. आज मुलाखत देताना ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे यांच्याविरोधात सुनेत्रा पवार यांना रिंगणात उतरवणे ही चूक झाली. तसे करायला नको होते.
घरात लाडकी बहीण आहे का? या प्रश्नाला उत्तर देताना ते म्हणाले की, राजकारण घरात शिरू द्यायचे नसते. पण माझ्याकडून ते झाले. राजकारण राजकारणाच्या ठिकाणी असते. बहिणी माझ्या सगळ्या लाडक्या आहेत. अनेक घरांमध्ये राजकारण चालते, पण राजकारण हे फार घरात शिरू द्यायचे नसते. मागे माझ्याकडून थोडीशी चूक झाली. त्या काळात मी माझ्या बहिणीच्या विरोधात सुनेत्राला उभे करायला नको होते. त्यावेळेस ते केले गेले. पक्षाच्या संसदीय बोर्डाने निर्णय घेतला. परंतु आता जे झाले ते झाले. एकदा बाण सुटल्यावर आपण काही करू शकत नाही. पण आज माझे मन मला सांगत आहे की, तसे व्हायला नको होते.
रक्षाबंधनाच्या सणाला सुप्रिया सुळे यांना भेटायला जाणार का, असाही प्रश्न विचारला असता अजित पवार म्हणाले की, आता माझा महाराष्ट्राचा दौरा सुरू आहे. रक्षाबंधनाच्या वेळी मी तिकडे असेन तर मी राखी बांधून घ्यायला बहिणींकडे जरूर जाईन.
बारामती लोकसभा मतदारसंघात पवार कुटुंबातच मुख्य लढत झाली होती. या लढतीत सुप्रिया सुळे यांनी अजित पवार यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांचा दीड लाखांहून अधिक मतांनी दणदणीत पराभव केला होता. अजित पवार यांच्यासाठी हा मोठा धक्का होता. त्यानंतर अजित पवार यांनी सुनेत्रा पवार यांची राज्यसभेवर वर्णी लावली. परंतु लोकसभा निवडणुकीच्या वेळी सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्यात कमालीची कटुता निर्माण झाली होती. निवडणुकीच्या प्रचारादरम्यानच्या भाषणांतून ती अनेकदा दिसून आली होती. ही कटूता अजूनही कमी
झालेली नाही.
आता लोकसभेचा निकाल लागून दोन महिने झाल्यानंतर अजित पवार यांनी आपल्या चुकीची कबुली का दिली, असा प्रश्न विचारला जात आहे. अजित पवार यांच्या कबुलीवर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, त्यांचे वक्तव्य माझ्या वाचनात आलेले नाही. मी एवढेच म्हणेन की, रामकृष्ण हरी! शिंदे गटाचे आमदार संजय शिरसाट म्हणाले की, राजकारणात थोड्या चुका होत असतात. सुप्रिया सुळेंविरोधात सुनेत्राला उभे करायचे की नाही हा त्यांचा वैयक्‍तिक विषय आहे. अजितदादांनी चूक झाल्याची कबुली दिली हा त्यांच्या मनाचा
मोठेपणा आहे.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top