सुनेत्रा पवारांना पाडले! सुळेंना छुपी मदत केली हर्षवर्धन पाटलांची धक्कादायक कबुली

इंदापूर – भाजपा नेते हर्षवर्धन पाटील यांनी आज अखेर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला. इंदापूरमध्ये आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात शरद पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पाटील यांना पक्षात प्रवेश देण्यात आला. याप्रसंगी आभार प्रदर्शनासाठी केलेल्या भाषणात पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला. ते म्हणाले की, लोकसभेच्या निवडणुकीत बारामती मतदारसंघात सुनेत्रा पवार यांच्या विरोधात जाऊन आम्ही सुप्रिया सुळे यांना छुपी मदत केली होती.
लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात बारामती लोकसभा मतदारसंघ सर्वाधिक चर्चेत राहिला. त्याची दोन प्रमुख कारणे होती. पहिले कारण म्हणजे अजित पवार यांनी काका शरद पवार यांचा पक्ष फोडून भाजपाचे बोट पकडल्यानंतरची ही लोकसभेची पहिलीच निवडणूक होती. त्यामुळे बारामतीत पवार विरुध्द पवार असा संघर्ष होणार अशी चर्चा निवडणुकीच्या आधीपासून म्हणजेच उमेदवारांची नावे जाहीर होण्याआधीपासून सुरू झाली होती. महाविकास आघाडीतून शरद पवार गटाच्या सुप्रिया सुळे यांची उमेदवारी निश्चित होती. पण महायुती किंवा अजित पवार कोणता उमेदवार देणार याची उत्सुकता होती. संपूर्ण राजकीय वर्तुळाचे बारामतीकडे लक्ष लागून राहिले होते. एक प्रकारे सस्पेन्स निर्माण झाला होता. अशा परिस्थितीत अजित पवार यांनी आपल्या पत्नी सुनेत्रा पवार यांचे नाव उमेदवार म्हणून जाहीर केले आणि बारामतीत पवार कुटुंबातील संघर्ष शिगेला पोहोचला.
शरद पवार आपली कन्या खासदार सुप्रिया सुळे यांच्यासाठी प्रचाराच्या मैदानात पूर्ण ताकदीनिशी उतरले. तर दुसरीकडे अजित पवार यांनी महायुतीतील अन्य सर्व लढतींकडे पाठ फिरवत फक्त आणि फक्त बारामतीवर लक्ष केंद्रित केले होते. बारामती मतदारसंघात एकेका दिवसात चार-चार, पाच-पाच सभा घेण्याचा सपाटा अजित पवार यांनी लावला होता. दुसरीकडे शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांचाही प्रचाराचा धडाका सुरू होता. पवार काका-पुतण्याने बारामतीची जागा प्रतिष्ठेची केली होती.
अजित पवार यांच्यासाठी ही निवडणूक अत्यंत खडतर ठरली. शिंदे गटाचे नेते आमदार विजय शिवतारे यांनी सर्वप्रथम अजित पवार कुटुंबियांच्या विरोधात दंड थोपटत बारामतीतून निवडणूक लढविण्याची घोषणा केली. त्यामुळे अजित पवारांसमोर एक मोठाच अडथळा आडवा आला. शिवतारेंच्या नाकदुर्‍या काढून त्यांना उमेदवारी मागे घ्यायला लावताना अजित पवारांच्या नाकीनऊ आले होते. अजित पवारांसमोर इंदापूर विधानसभा मतदारसंघ ही दुसरी मोठी अडचण होती. बारामती लोकसभा मतदारसंघातील सहा विधानसभा मतदारसंघांपैकी इंदापूर हा एक मतदारसंघ आहे. इंदापूरवर हर्षवर्धन पाटील यांचे निर्विवाद वर्चस्व आहे. हर्षवर्धन पाटील मुळात काँग्रेसचे नेते होते. ते आणि अजित पवार यांच्यातील विळ्या-भोपळ्याचे नाते अवघा महाराष्ट्र जाणतो. पण हर्षवर्धन पाटील हे दरम्यानच्या काळात भाजपाच्या दबावासमोर झुकत ‘शांत झोप घेता यावी म्हणून’ भाजपावासी झाले होते. यामुळे महायुतीत अजित पवार आणि हर्षवर्धन या राजकीय शत्रूना एकत्र लढणे भाग होते. परंतु त्यांच्यातील संघर्ष शमला नव्हता. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारादरम्यान तर अजित पवार समर्थक हर्षवर्धन पाटील यांच्याबद्दल चौकसभांमधून शिवराळ भाषेत बोलत होते. त्यांना धमकावत होते. अखेर याची तक्रार पाटील यांनी राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली होती. एवढ्यापर्यंत प्रकरण गेल्याने अजित पवार यांची घालमेल सुरू झाली. इंदापूरमधून सुनेत्रा पवार यांना मतदारांची साथ लाभावी म्हणून अजित पवार वारंवार इंदापूरमध्ये येऊन महत्त्वाच्या व्यक्तींच्या भेटी-गाठी घेत होते. शेवटच्या टप्प्यात तर फडणवीस यांनी इंदापूरमध्ये जाऊन शरद पवार गटाच्या महत्त्वाच्या नेत्यांना आपल्या सोबत घेऊन अजित पवारांना मदत केली होती. हर्षवर्धन पाटील यांची समजूत काढायला फडणवीस यांनी त्यांची व अजित पवार यांच्या बैठका घडवून आणल्या. अजित पवार नंतर हर्षवर्धन पाटील यांच्या घरी गेले. लोकसभेत मदत केल्यास विधानसभेत साथ देऊ, असेही आश्वासन दिले. एवढे सर्व झाल्यावरही हर्षवर्धन पाटील आणि त्यांचे समर्थक सुनेत्रा पवार यांना खरोखरच मदत करतील का, याची शाश्वती अजित पवारांना नव्हती. झालेही तसेच. बारामतीमधून सुनेत्रा पवार यांचा पराभव करीत सुप्रिया सुळे दीड लाखांहून अधिकच्या दणदणीत मताधिक्क्याने विजयी झाल्या. अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार पराभूत झाल्या. हर्षवर्धन पाटील यांच्या इंदापूर मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना 25 हजार 689 मते मिळाली. हा निकाल स्पष्टच सांगत होता की, इंदापूर विधानसभा
मतदारसंघात हर्षवर्धन पाटील आणि त्यांच्या समर्थकांनी युतीचा धर्म पाळलेला नाही. त्यांनी महायुतीच्या आमदार म्हणून सुनेत्रा पवार यांना मतदान करणे अपेक्षित होते. पण तसे झाले नाही. त्यामुळे हर्षवर्धन पाटील यांच्यावर अजित पवार यांना दाट संशय होता. आज अखेर पाटील यांनी सुप्रिया सुळे यांना मदत केल्याची जाहीर कबुलीच देऊन अजित पवारांच्या मनात असलेला संशय खरा ठरवला.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top