सुनीता विल्यम्स फेब्रुवारीत अंतराळातून परतणार 

वॉशिंग्टन – अंतराळातील आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर गेलेल्या सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना फेब्रुवारी २०२५ मध्ये पृथ्वीवर आणले जाईल अशी माहिती अमेरिकेची अंतराळ संशोधन संस्था नासाने दिली. बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमधील तांत्रिक समस्यांमुळे दोघे अंतराळवीर तिकडे अडकून असल्याचे नासाकडून सांगण्यात आले आहे. त्यामुळे सुनीता विल्यम्सना पुढील आठ महिने स्पेस स्टेशनवर थांबावे लागणार आहे.  

सुनीता विल्यम्स आणि बुच विलमोर यांना ५ जून रोजी बोइंग आणि नासाच्या संयुक्त ‘क्रू फ्लाइट टेस्ट मिशन’वर आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर पाठवले होते. ही मोहीम केवळ आठ दिवसांची होती. मात्र गेले दोन महिने ते अंतराळात अडकले आहेत. बोईंगच्या स्टारलाइनर कॅप्सूलमध्ये हेलियम गळती आणि थ्रस्टरच्या समस्यांमुळे दोघांना पृथ्वीवर परतण्यास अडथळे निर्माण झाले आहेत. या समस्यांमुळे या कॅप्सूलमधून त्यांना परत आणण्याचा निर्णय नासाने रद्द केला आहे. त्यामुळे आता या दोघांना एलन मस्क यांच्या स्पेसएक्सच्या ड्रॅगन क्रू कॅप्सूलच्या माध्यमातून पुढील वर्षी फेब्रुवारीत पृथ्वीवर परत आणले जाईल अशी माहिती नासाने दिली.  

नासाने दिलेल्या माहितीनुसार, आंतरराष्ट्रीय स्पेस स्टेशनवर सध्या ७ अंतराळवीर आहेत. तेथे अधिक अंतराळवीरांसाठी जागा आहे. सुनीता आणि बुच यांनी स्टेशनवर राहून विविध संशोधन कार्यात सहकार्य केले आहे. ते दोघेही सध्या सुरक्षित आणि निरोगी आहेत. स्पेस स्टेशनवरील त्यांचे अतिरिक्त वास्तव्य त्यांच्या करिअरमधील एक अनोखा अनुभव ठरू शकतो, परंतु त्यांच्या सुरक्षिततेसाठी नासा आणि स्पेसएक्सने सर्व आवश्यक उपाययोजना केली आहे. दोघांच्या परतीच्या सुरक्षेसाठी सर्व उपाययोजना करण्यात आल्या आहेत.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top