खार्टू : सुदानमध्ये लष्कर आणि निमलष्करी दल यांच्यात युद्ध पेटले आहे. या दोन्ही दलांकडून एकमेकांच्या तळावर हल्ले सुरू असून, देशात तणावाची परिस्थिती निर्माण झाली आहे. गोळीबार आणि चकमकीच्या पार्श्वभूमीवर भारतीयांना घराबाहेर न पडण्याचे आदेश तेथील भारतीय दुतावासाने दिले आहेत.
सुदानमधील निमलष्करी रॅपिड सपोर्ट फोर्सच्या नियमित सैन्याचे एकत्रीकरण करण्यावरून सुदानचे लष्करी नेते अब्देल फतेह अल-बुरहान आणि निमलष्करी कमांडर मोहम्मद हमदान डगालो यांच्यात गेल्या काही दिवसांपासून तणाव होता. हा तणाव वाढल्याने दोन्ही दले आक्रमक झाली असून, एकमेकांचे तळ ताब्यात घेण्यासाठी हल्ले करू लागले आहेत. लष्करी तळाजवळ स्फोट आणि गोळीबाराचे आवाज ऐकू येत आहेत. लष्करप्रमुख अल-बुरहान यांचे निवासस्थान आणि खार्तूमचे आंतरराष्ट्रीय विमानतळ निमलष्करी दलाने ताब्यात घेतल्याचा दावा केला आहे. तसेच राजधानी खार्तूमसह सुदानमध्ये तणावाची परिस्थिती निर्माण झाल्याने भारतीय दुतावासाने आश्रय केंद्रे उभारली आहेत. भारतीयांना तेथील आश्रय केंद्रांमध्ये थांबण्यास सांगण्यात आले आहे. कृपया शांत राहा आणि पुढील अपडेटची प्रतीक्षा करा, असे भारतीय दुतावासाने म्हटले आहे.