‘सुझुकी’ कंपनीचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचे निधन !

टोकियो- भारतीय मोटर वाहन उद्योगाला नवीन दिशा देणाऱ्या आणि मध्यमर्गीयांच्या चारचाकी गाडीचे स्वप्न पूर्ण करणारे सुझुकी मोटर्स कंपनीचे माजी अध्यक्ष ओसामु सुझुकी यांचे वयाच्या ९४ व्या वर्षी निधन झाले.त्यांना लिम्फोमा नावाच्या आजाराने ग्रासले होते. जपानच्या सुझुकी मोटर कॉर्पोरेशनतर्फे ही माहिती देण्यात आली.

ओसामू सुझुकी हे मारुती सुझुकी इंडिया लिमिटेडचे संचालक आणि मानद अध्यक्ष होते. १९८१ मध्ये मारुती उद्याोग लिमिटेडबरोबर संयुक्त उपक्रम स्थापन करण्यासाठी तत्कालीन भारत सरकारबरोबर भागीदारी करण्याचा धाडसी निर्णय घेणारे व्यक्तिमत्त्व, अशी सुझुकी यांची ओळख आहे. तत्कालीन काळात परवाना व्यवस्थेअंतर्गत भारत ही एक बंद अर्थव्यवस्था होती. तेव्हा सुझुकी यांना देशातील मोटर वाहन उद्योगाला चालना तथा नवीन दिशा देणारे व्यक्ती म्हणून ओळखले जात होते. २००७ मध्ये सरकारने सुझुकी मोटर कॉर्पोरेशनमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेतल्यानंतर मारुती उद्याोग लिमिटेड ही कंपनी नंतर मारुती सुझुकी इंडिया लिमिटेड म्हणून नावारूपाला आली. सुझुकी यांचा जन्म ३० जानेवारी १९३० रोजी जपानमधील गेरो येथे झाला. चुओ विद्यापीठातून विधि शाखेची पदवी प्राप्त केली होती. एप्रिल १९५८ मध्ये त्यांनी तत्कालीन सुझुकी मोटर कंपनी लिमिटेडमध्ये प्रवेश केला. नोव्हेंबर १९६३ मध्ये त्यांची संचालक म्हणून नियुक्ती झाली आणि डिसेंबर १९६७ मध्ये ते संचालक आणि व्यवस्थापकीय संचालक झाले.

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top