नवी दिल्ली- अरविंद केजरीवाल यांच्या सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने आज फेटाळली. केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर नाही आणि सीबीआयने त्यांना कोणतेही कारण नसताना अटक केली असे म्हणता येणार नाही, असे न्यायालयाने स्पष्ट केले.
दिल्लीतील कथित दारू घोटाळ्यात केजरीवाल यांना ईडी आणि सीबीआयने अटक केली आहे. या अटक कारवाईला दिल्ली उच्च न्यायालयात आव्हान देत केजरीवाल यांनी अंतरिम जामिनासाठी याचिका केली होती. मात्र ही याचिका आज उच्च न्यायालयाने फेटाळली. सीबीआयच्या अटकेला आव्हान देणारी याचिका फेटाळताना न्यायमूर्ती नीना बन्सल कृष्णा यांच्या खंडपीठाने सांगितले की, केजरीवाल यांची अटक बेकायदेशीर नाही आणि सीबीआयने त्यांना कोणतेही कारण नसताना अटक केली असे म्हणता येणार नाही.
ईडीच्या ताब्यात असताना केजरीवाल यांना २६ जून रोजी सीबीआयने अटक केली होती. मनी लाँड्रिंग प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने त्यांना अंतरिम जामीन मंजूर केला आहे. सीबीआयच्या अटेकविरोधात न्यायालयाने त्यांना कनिष्ठ न्यायालयात जामीन अर्ज दाखल करण्याची मुभा दिली होती. या प्रकरणी उच्च न्यायालयाने १७ जुलै रोजी केजारीवालांच्या जामीन अर्जावरील निर्णय राखून ठेवला होता.
दिल्ली मद्य धोरण घोटाळा प्रकरणात बीआरएस नेत्या के. कविता यांच्या जामीन अर्जावरील सुनावणी राऊस ॲव्हेन्यू कोर्टाने ७ ऑगस्टपर्यंत पुढे ढकलली आहे. आज झालेल्या सुनावणी दरम्यान कोर्टाने हा निर्णय दिला. के.कविता यांच्या वकिलाने युक्तिवादासाठी न्यायालयाकडे वेळ मागितला आहे. त्यामुळे न्यायालयाने सुनावणी पुढे ढकलली. दिल्ली उत्पादन शुल्क धोरणाशी संबंधित सीबीआय प्रकरणात के.कविता यांनी नियमित जामीन मागितला आहे.