मुंबई- गेल्या महिन्यात राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाने मुंबईतील कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जन म्हणजेच सीपीएस अंतर्गत असलेले सर्व अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आता हा निर्णय आयोगाने मागे घेण्याची घोषणा केली आहे. त्यामुळे वैद्यकीय शिक्षण घेणार्या विद्यार्थ्यांना दिलासा मिळाला आहे.
मुंबई उच्च न्यायालयाच्या २२ ऑगस्ट रोजीच्या आदेशाचे पालन करून हा अभ्यासक्रम बंद करण्याचा निर्णय मागे घेण्यात आल्याचे सांगण्यात आले आहे. राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या अभ्यासक्रम सुरुवातीच्या जाहीर नोटिशीमुळे वैद्यकीय क्षेत्रात चिंतेचे वातावरण होते. ‘सीपीएस’ ही पूर्वीच्या ‘आयएमसी’ कायदा १९५६ च्या व्याख्येनुसार आणि एनएमसी कायदा २०१९ च्या कलम २(१) नुसार चालणारी वैद्यकीय संस्था आहे.आदेशानुसार १९१२ मध्ये तत्कालीन भारत सरकारने ‘परीक्षण संस्था’ म्हणून तिची स्थापन केली आहे. महाराष्ट्रातील ही एकमेव अशी विशेष दर्जा असलेली संस्था असून ती राज्यातील आरोग्य सेवा क्षेत्रातील एक महत्त्वाचा भागही बनली आहे.कॉलेज ऑफ फिजिशियन अँड सर्जनचे अध्यक्ष डॉ.अजय सांबरे म्हणाले की,‘सीपीएस’ राष्ट्रीय वैद्यकीय आयोगाच्या या निर्णयाचे स्वागत करत असून या निर्णयामुळे सर्व नकारात्मक टिप्पणी आणिl तर्कवितर्क बंद होतील.