मुंबई : व्यावसायिक अभ्यासक्रमांमध्ये प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना शिक्षणातील संधी आणि क्षमता ओळखण्यासाठी मदत मिळावी, या उद्देशाने राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने ‘अटल’ उपक्रम सुरू केला आहे. मात्र, या उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अपेक्षेप्रमाणे प्रतिसाद मिळाला नाही आहे. आतापर्यंत सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थ्यांनी आणि सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे.
व्यावसायिक अभ्याक्रमात प्रवेश घेऊ इच्छिणाऱ्या विद्यार्थ्यांना त्यांच्या क्षमतांचा शोध घेता यावा यासाठी राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाने १६ जानेवारीपासून ‘सीईटी-अटल’ ही ऑनलाईन प्रणाली सुरू केली आहे. विद्यार्थ्यांसाठी या प्रणालीमध्ये सराव चाचण्या आणि सायकोमेट्रिक चाचण्यांचा समावेश आहे.सराव चाचण्यांमुळे विद्यार्थ्यांना परीक्षेचे वातावरण समजून घेता येईल. तसेच, सायकोमेट्रिक चाचण्या वैयक्तिक क्षमता, स्वारस्य आणि योग्यतेचे मूल्यांकन करण्यासाठी तयार केल्या आहेत. विद्यार्थ्यांच्या मनावरील ताण कमी करण्याच्या उद्देशाने सुरू केलेल्या ‘अटल’ उपक्रमाला विद्यार्थ्यांकडून अल्प प्रतिसाद मिळत असल्याचे निदर्शनास आले. ही सेवा सुरू होऊन १५ दिवस उलटले तरी आतापर्यंत केवळ २ हजार ८३८ विद्यार्थ्यांनी ‘अटलसाठी नोंदणी केली आहे. यामध्ये सायकोमेट्रिक चाचणीसाठी २४३ विद्यार्थांनी, तर सराव चाचण्यांसाठी २ हजार ५९५ विद्यार्थ्यांनी नोंदणी केली आहे. मात्र यातील अवघ्या ३५४ विद्यार्थ्यांनी शुल्क भरून नोंदणी केली आहे. दरम्यान, राज्यभरातून १९ वेगवेगळ्या विषयांच्या सीईटीसाठी ९ लाख २५ हजारांपेक्षा अधिक विद्यार्थ्यांनी नोंदणी केली असल्याची माहिती राज्य सामाईक प्रवेश परीक्षा कक्षाकडून दिली आहे.