पुणे:
पुण्यात रविवारी मध्यरात्री पुणे- सातारा रस्त्यावरील डी मार्टच्या शेजारी सिलेंडरचा स्फोट होऊन तीन दुकाने जळून खाक झाली. आगीनंतर स्फोट झाल्याने दोन मजली इमारतीत मोठी पडझड झाली आहे. हा स्फोट इतका मोठा होता की त्यामुळे दुकानांचे शटर, भिंतीचे कॉलम, दगड, विटा व इतर साहित्य रस्त्यावर येऊन पडले होते. या घटनेत दोन नागरिक जखमी झाले आहेत. सुदैवाने यात जीवितहानी झाली नाही.
सातारा रस्त्यावर डी मार्ट जवळ मध्यरात्री अडीच वाजता काही दुकांनात सिलेंडरचा स्फोट होऊन आग लागली. या आगीची माहिती अग्निशामक दलाच्या कर्मचाऱ्यांना मिळात त्यांनी घटनास्थळी धाव घेतली. दलाकडून ०६ फायरगाड्या, २ वॉटर टँकर व १ रुग्णवाहिका रवाना झाल्या होत्या. या आगीत गॅस शेगडी, चिमण्या, गॅस गिझर, वॉटर प्युरिफायर, फ्रिज, वॉशिंग मशीन, टिव्ही, मोबाईल, बॅटरी जळून खाक झाल्याने मोठे नुकसान झाले आहे.