मुंबई
मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक अचानक स्थगित करण्याच्या निर्णयाविरोधात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली होती. या याचिकेवर काल सुनावणी पार पडली. न्यायालयाने याचिकेची गंभीर दखल घेत सिनेट निवडणूक स्थगित का करण्यात आली, असा सवाल उपस्थित केला. राजकीय दबावातून मुंबई विद्यापीठाची सिनेट निवडणूक स्थगित करण्यात आल्याचा दावा या याचिकेत करण्यात आला. मात्र, याबाबत सवाल उपस्थित करत न्यायालयाने राज्य सरकार आणि विद्यापीठ प्रशासनाला प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले.
मतदार याद्यांमधील तफावतीसंदर्भात चौकशी करण्यासाठी समिती नेमण्यात आल्याची माहिती विद्यापीठाने न्यायालयाला दिली. ही समिती २९ सप्टेंबरपर्यंत याबाबतचा अहवाल सादर करणार असल्याचेही विद्यापीठाने सांगितले. यानंतर ३ ऑक्टोबरला पुढील सुनावणी पार पडणार आहे. दरम्यान, मुंबई विद्यापीठाकडून ९ ऑगस्ट रोजी सिनेट निवडणूक जाहीर करण्यात आली होती. १० सप्टेंबर रोजी यासाठी मतदान आणि १३ सप्टेंबरला निवडणुकीचा निकाल लागणार, असेही विद्यापीठाने जाहीर केले होते. मात्र, त्यानंतर ही निवडणूक अचानक स्थगित करण्यात आल्याने हे प्रकरण न्यायालयात गेले.