मुंबई- दादरमधील विख्यात सिद्धिविनायक मंदिरात मिळणाऱ्या प्रसादाच्या टोपलीमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करणारा कथित व्हिडिओ व्हायरल झाला आहे.मात्र हा दावा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष व शिवसेना नेते सदा सरवणकर यांनी फेटाळून लावला आहे.तसेच या व्हिडिओ प्रकरणाची पोलीस उपायुक्त स्तरावरील अधिकारी नेमून चौकशी केली जाईल,असे सरवणकर यांनी सांगितले.
या मंदिरातील प्रसादाच्या ट्रेमध्ये उंदरांचा वावर असल्याचा दावा करण्यात येत आहे. सोशल मीडियावर या घटनेचा व्हिडीओ चांगलाच व्हायरल झाला आहे.यानंतर मंदिर परिसरातील स्वच्छतेवर प्रश्न उपस्थित होऊ लागले आहेत.सिद्धिविनायक मंदिराच्या प्रशासनाने मात्र या वृत्तात तथ्य नसल्याचे स्पष्ट केले आहे. हा व्हिडीओ बनावट आहे, तो मंदिरबाहेरचाही असू शकतो.मंदिर परिसरात नेहमी स्वच्छता असते, सिद्धिविनायक मंदिर विरोधात कोणीतरी कट रचत आहे,असा दावा सिद्धिविनायक न्यास मंदिराचे अध्यक्ष सरवणकर यांनी केला आहे.मात्र, प्रसादाच्या ट्रेमध्ये उंदीर असल्याच्या व्हिडीओची आणि फोटोंची तपासणी करण्यात येईल,चौकशी केली जाईल,असे सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनीही स्पष्ट केले आहे.