नवी मुंबई : नवी मुंबई शहर सिडकोने व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यासाठी सल्लागार कंपनीची निवड केली आहे. या सल्लागार कंपनीला सिडको तब्बल २८ कोटी दिले जाणार आहेत. यामुळे सिडकोवर नाराजी व्यक्त केली जात आहे. गेल्या काही महिन्यात अशाच पध्दतीने सल्लागार कंपन्यांवर पैशांची उधळण करणाऱ्या सिडकोची झोळी लवकर रिकामी होण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे.
सिडकोच्या माध्यमातून सीवूड पामबीचलगत आलिशान व्हीआयपी गृह प्रकल्प उभारण्यात येणार आहे. आमदार, खासदार, न्यायाधीश, आयएएस, आयपीएस आदी महत्वाच्या लोकांना या गृहप्रकल्पात घरे देणार आहेत. दोन ते चार बीएचके घरांची दीड ते साडेतीन कोटीपर्यंत किमत असणार आहे. एकूण ५२५ घरे बांधण्यात येणार आहेत. हा गृह प्रकल्प कसा असावा यासाठी सल्लागार कंपनीची नेमणूक करण्यात येणार आहे. या कंपनीला सल्ला देण्यासाठी तब्बल २८ कोटी रुपये सिडको मोजणार आहे.