सिंधुदुर्ग- वेंगुर्ले तालुक्यातील चिपी विमानतळावरून थेट पुण्यासाठी येत्या ३१ ऑगस्टपासून विमानसेवा सुरू होणार आहे. ही विमान सेवा देणार्या गोव्यातील फ्लाय-९१ विमान कंपनीनेच याबाबतची माहिती आपल्या संकेतस्थळावरून प्रवाशांसाठी दिली आहे.
येत्या ३१ ऑगस्टपासून दर शनिवार व रविवार असे आठवड्यातून दोन दिवस ही विमानसेवा उपलब्ध असेल. चिपी विमानतळावरून पुण्यासाठी विमानसेवा सुरू करावी, अशी आग्रही मागणी प्रवाशांकडून होत होती ती आता पूर्ण झाली आहे.सिंधुदुर्गवासी मोठ्या प्रमाणात नोकरी-व्यवसाय व शिक्षणासाठी पुण्यात वास्तव्यास आहेत. या विमानसेवेमुळे आता त्यांना दिलासा मिळाला आहे. ऐन गणेशोत्सवात ही सेवा सुरू होत असल्याने गणेश चतुर्थीसाठी पुणेकरांची सिंधुदुर्गात येण्याची चांगलीच सोय झाली आहे. पुणे येथून दर शनिवारी व रविवारी सकाळी आठ वाजून पाच मिनिटांनी उड्डाण करणारे विमान नऊ वाजून दहा मिनिटांनी चिपीला पोहचेल.परतीच्या प्रवासाला सकाळी साडे नऊला सुटून पुणे येथे सकाळी दहा वाजून पस्तीस मिनिटांनी पोचेल. तिकीट दर १९९० रूपये आहे.फ्लाय ९१ विमानसेवेच्या तिसऱ्या यशस्वी मोहिमेनंतर आता चिपी-मुंबई अशी विमानसेवा सुरू करावी, अशी मागणी प्रवाशी वर्गातून होत आहे.