सिंधुदुर्ग- मालवण तालुक्यातील कुंभारमाठ येथील आंबा बागायतदार उत्तम सूर्यकांत फोंडेकर यांच्या बागेतून थंडीच्या मोसमातील हापूस आंब्याची पहिली पेटी नाशिकला पाठविण्यात आली आहे.यंदाच्या हंगामातील या पहिल्या चार डझन आंब्याच्या पेटीला २५ हजार रुपये दर मिळाला आहे.
उत्तम फोंडेकर यांनी जुलै-ऑगस्ट महिन्यात आलेल्या मोहोराचे संरक्षण करून उत्पादन घेतले आहे. आंब्याची पहिली पेटी पाठविण्याचा मान त्यांनी चौथ्यांदा मिळविला आहे. सिंधुदुर्गात या वर्षी ६ जून ते आतापर्यंत अखंडपणे मुसळधार पाऊस सुरू आहे.मात्र प्रतिकूल वातावरण असतानाही जुलै, ऑगस्टमध्ये हापूस आंब्याच्या काही झाडांना मोहोर आला होता.त्या मोहोराचे संरक्षण करण्याचा निर्णय फोंडेकर यांनी घेतला होता.प्रत्येक वर्षी ते काही झाडांवरील मोहोराचे संरक्षण करत असतात. केवळ सेंद्रिय कीटकनाशकांचा वापर करून त्यांनी हा मोहोर टिकविला आहे. त्यातून आता त्यांना दोन ते तीन पेटी आंबा उत्पादन मिळण्याचा अंदाज आहे. यातील पहिली चार डझन आंब्याची पेटी पाडव्याच्या मुहूर्तावर त्यांनी नाशिक येथील ग्राहकाला विकली आहे.या ग्राहकाकडून त्यांना २५ हजार रुपये दर देण्यात आला आहे. आणखी १५ ते २० दिवसांनी आणखी चार डझन आंबा उत्पादन मिळेल अशी अपेक्षा फोंडेकर यांनी व्यक्त केली आहे.