पुणे – मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या काल झालेल्या शुभारंभाच्या कार्यक्रमात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि अजित पवार या तीन भावांनी एकमेकांची तोंडभरून स्तुती केली. मात्र आज दुसर्याच दिवशी हे तीनही भाऊ एकमेकांच्या विरोधात उभे ठाकले. त्यांनी ज्यांना सावत्र भाऊ म्हटले त्यांची मात्र एकी कायम आहे.
जुन्नरच्या नारायणगावात भाजपाच्या पदाधिकार्यांनी जोरदार आंदोलन करीत ठिय्या देऊन अजित पवार यांच्या जनसन्मान यात्रेला काळे झेंडे दाखवले तर आंबेगावमध्ये अजित पवार यांनी आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेसंबंधीच्या बैठकीवर शिवसेना शिंदे गटाने बहिष्कार टाकला. दोन भावांनी अजित पवार यांना पुन्हा एकदा
एकटे पाडले.
अजित पवार यांची जनसन्मान यात्रा आज सकाळी जुन्नर विधानसभा क्षेत्रात आली होती. त्यावेळी नारायणगावमध्ये भाजपाच्या माजी जिल्हा परिषद अध्यक्षा आशा बुचके यांनी हजारो समर्थकांसह अजित पवारांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे आंदोलन केले. बुचके यांच्यासोबत मोठ्या संख्येने पदाधिकारी आणि कार्यकर्ते होते. त्यांनी अजित पवार यांच्या विरोधात जोरदार घोषणाबाजी केली. जुन्नर तालुक्याच्या पर्यटन विकासाबाबत अजित पवार लपून बैठका घेतात. त्यांनी शासकीय अधिकार्यांची बैठक बोलावली होती. या बैठकीचे निमंत्रण महायुतीतील घटक पक्षांना देण्यात आले नाही, असा बुचके आणि भाजपाच्या पदाधिकार्यांचा आरोप होता. त्यावरून कार्यक्रमस्थळी बुचके आणि त्यांच्या सहकार्यांनी ठिय्या आंदोलन केले.
आशा बुचके तर अजित पवार यांच्याबाबत अत्यंत आक्रमकपणे भूमिका मांडत होत्या. त्या म्हणाल्या की, अजित पवार यांच्यामुळे लोकसभा निवडणुकीत महायुतीचे खूप नुकसान झाले. विधानसभेतही तसेच होण्याची शक्यता नाही. असे असताना महायुतीत अजित पवार आजही आहेत. मात्र ते शासकीय कार्यक्रमदेखील आपल्या पक्षाचा कार्यक्रम असल्यासारखे भासवतात. त्यांना महायुतीत राहायचे नसेल तर त्यांनी आत्ताच तसे जाहीर करावे. ते गुपचूप पर्यटनाबाबत बैठक बोलावतात.
सीईओपासून सर्वांना फोन जातो. सरकारी कार्यक्रम असूनही मुख्यमंत्री आणि फडणवीस यांचा बॅनरवर फोटो नाही. आमच्या नेत्यांचा अपमान आम्ही सहन करणार नाही. युतीचा धर्म न पाळणे ही अजित पवार यांची जुनी खोड आहे. त्यांचे जसे कृत्य आहे तसे त्यांना शासन झाले पाहिज, अशी मागणी बुचके यांनी केली. अखेर पोलिसांनी बुचके आणि त्यांच्या पदाधिकार्यांना
ताब्यात घेतले.
बुचके या अनेक वर्षे शिवसेनेच्या नेत्या होत्या. त्या पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्य होत्या. 2014 साली विधानसभा निवडणूक शिवसेनेकडून लढवताना मनसेचे सोनावणे यांनी त्यांचा पराभव केला. 2019 साली शिवसेनेने त्यांची हकालपट्टी केली. 2021 साली त्यांचा फडणवीस यांच्या हस्ते भाजपात प्रवेश झाला.
आंबेगाव येथेही अजित पवार यांना विरोध झाला. मात्र इथे भाजपाऐवजी शिंदे गटाने विरोध केला. अजित पवार यांनी आंबेगावात आयोजित केलेल्या लाडकी बहीण योजनेसंदर्भातील बैठकीची प्रसिध्दी करण्यासाठी लावण्यात आलेल्या बॅनरवर मुख्यमंत्री हा शब्दच नव्हता. माझी लाडकी बहीण असे बॅनरवर लिहिले होते. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याही नावाचा उल्लेख बॅनरवर नव्हता. त्यावर आक्षेप घेत शिंदे गटाच्या पदाधिकार्यांनी बैठकीवर बहिष्कार टाकला.
बुचकेंची प्रकृती बिघडली
अजित पवार यांच्या विरोधात अत्यंत आक्रमकपणे घोषणाबाजी केल्यानंतर काही वेळाने आशा बुचके यांना अस्वस्थ वाटू लागले. त्यांचा रक्तदाब वाढला. त्यामुळे त्यांना नारायणगाव येथील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. उपचारानंतर त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टरांनी सांगितले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते भडकले
राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे नेते त्यानंतर आक्रमक झाले आहेत. निषेधाच्या घटनेचा विरोध करत त्यांनी थेट भाजपावर निशाणा साधला आहे. हा पक्षाचा कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणार्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा, असे आव्हान राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी थेट उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना केले. अमोल मिटकरी यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाऊंटवर पोस्ट करत भाजपावर निशाणा साधला. त्यांनी या पोस्टमध्ये म्हटले की, जनसन्मान यात्रा हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा स्वतंत्र कार्यक्रम आहे. काळे झेंडे दाखवणार्यांनी स्वतंत्र कार्यक्रम घ्यावा आणि आज जे काळे झेंडे दाखवले गेले त्याबाबत देवेंद्रजींनी तत्काळ खुलासा करावा. राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरेंनी प्रतिक्रिया देत म्हटले की, महायुतीच्या एकतेला कोणी गालबोट लावत असेल तर भाजपने त्यांना ताकीद द्यावी. अनेक जिल्ह्यांत भाजपाचे पालकमंत्री आहेत. अगदी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा विविध जिल्ह्यांत जाऊन शासकीय अधिकार्यांसोबत बैठका घेतात. त्यावेळी महायुतीतील इतर घटक पक्ष त्यावर आक्षेप घेत नाहीत. मग पालकमंत्री म्हणून अजित पवार आम्हाला डावलतात, असा आक्षेप कशासाठी? भाजपाच्या नेत्या आशा बुचकेंच्या या टीकेला उत्तर देण्याची मला तरी काही गरज वाटत नाही. मी भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्याशी बोलणार आहे. अजित पवारांना काळे झेंडे दाखवणे ही निव्वळ स्टंटबाजी असल्याचे म्हणत अजित पवार गटाच्या रुपाली चाकणकरांनी आशा बुचकेंची खिल्ली उडवली. काळे झेंडे दाखवण्यापेक्षा थेट अजितदादांना भेटल्या असत्या तर प्रश्न मार्गी लागायला मदत झाली असती. पण केवळ बातम्या व्हाव्यात म्हणून बुचकेंनी ही स्टंटबाजी केली, असेही त्या पुढे म्हणाल्या.