सावंतवाडी- शहरात मोबाईल कंपन्यांकडून ऐन पावसाच्या तोंडावर शहरातील तसेच अंतर्गत रस्त्यावर केबल घालण्यासाठी खोदण्यात आलेली चर अतिशय धोकादायक बनली आहे. त्याठिकाणी टाकण्यात आलेली माती वाहून गेल्यामुळे खड्डे पडले असून अपघात होण्याची शक्यता आहे.त्यामुळे पालिका प्रशासन व सार्वजनिक बांधकाम विभागाने तत्काळ हे खड्डे बुजवावेत, अन्यथा या खड्ड्यात वृक्षारोपण करू व होणारे अपघात टाळू असा इशारा माजी आमदार परशुराम उपरकर समर्थक आशिष सुभेदार यांनी दिला आहे.
सावंतवाडी शहरातील मुख्य रस्त्यांसह अंतर्गत रस्त्यावर तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या ताब्यात असलेल्या रस्त्यावर काही मोबाईल कंपन्यांकडून केबल टाकण्यासाठी खोदकाम केले होते. पावसाळ्याच्या तोंडावर विरोध असतानासुद्धा हे काम केले होते. परंतु, काम पूर्ण झाल्यानंतर त्या ठिकाणी पडलेले खड्डे तसेच आहेत.याबाबत वारंवार प्रशासनाचे लक्ष वेधूनही त्याकडे कानाडोळा झालेला आहे.त्यामुळे पालिका प्रशासन व बांधकाम विभागाने तात्काळ दखल घेऊन हे खड्डे बुजवावेत ,अन्यथा त्या ठिकाणी वृक्षारोपण करू,असा इशारा सुभेदार यांनी दिला आहे.