नवी मुंबई – सायन पनवेल महामार्गावर आज सकाळी सहा वाजताच्या सुमारास अपघात झाला. या अपघातात एका रिक्षाचालकाचा मृत्यू झाला. जुईनगर स्थानकासमोर मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या होंडा सिव्हिक कार आणि दोन उभ्या असलेल्या रिक्षांचा अपघात झाला. या घटनेत घनश्याम यादव या रिक्षा चालकाचा मृत्यू झाला. पहाटे रेल्वे स्थानकाजवळ या महामार्गावर दोन रिक्षा प्रवाशांसाठी वाट पाहत उभ्या होत्या. त्याचवेळी होंडा सिव्हिक कारने उभ्या असलेल्या दोन्ही रिक्षांना धडक दिली.
या धडकेत एक रिक्षा चालक रिक्षामध्येच अडकला आणि त्यामध्ये त्याचा मृत्यू झाला. तसेच, या अपघातात दोन्ही रिक्षा आणि चारचाकी वाहनाचे नुकसान झाले. या दुर्घटनेनंतर, स्थानिक वाहतूक पोलीस घटनास्थळी तत्काळ दाखल झाले होते. त्यांनी तिन्ही वाहने बाजूला करून जखमींना सहाय्य केले. दरम्यान,नेरुळ पोलिसांनी होंडा सिव्हिक कार चालकाला ताब्यात घेतले आहे. स्थानिक पोलीस या अपघाताचा अधिक तपास करत आहेत. याशिवाय रस्ता अपघात नियंत्रणासाठी सुरक्षिततेच्या दृष्टीने योग्य उपाययोजना करण्याचे निर्देश प्रशासनाने दिले आहेत.