सातारा- मराठा आरक्षण मागणीसाठी लढणार्या मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषण आंदोलनानंतर राज्यातील सर्व जिल्ह्यात कुणबीच्या नोंदींचा शोध घेतला जात आहे.मागील २ दिवसांत सातारा जिल्ह्यात तब्बल २० हजारांवर कुणबी नोंदी सापडल्या आहेत. त्यापैकी सर्वाधिक नोंदी पाटण व सातारा तालुक्यांत आहेत.विशेष म्हणजे मराठवाड्यापेक्षाही जास्त नोंदी सातारा जिल्ह्यात आढळतील,अशी शक्यता निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील यांनी वर्तवली आहे.
जिल्ह्यातील कुणबी नोंदी शोधण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयासह सर्व तहसील व प्रांत कार्यालयात स्वतंत्र कक्ष स्थापन केला आहे.सर्व तहसील कार्यालयांसह १२ विभागांकडील नोंदी तपासण्याचे काम सुरू आहे. त्यासाठी जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी हे या प्रक्रियेवर जातीने लक्ष ठेऊन आहेत. कुणबीच्या सर्वाधिक नोंदी या महसूलकडेच आहेत. त्यामुळे तलाठी,कोतवाल, अन्य कर्मचारी,कंत्राटी कर्मचारी,ऑपरेटर यासह शिक्षण विभाग,पोलिस अधिकारी,कर्मचारी, पालिकांचे कर्मचारी यांच्यासह सर्व विभागांचे अधिकारी व कर्मचारी सध्या कुणबी नोंदीचा शोध घेत आहेत.सर्व विभागांनी मिळून आतापर्यंत ४ लाख ५९ हजार दस्तावेज तपासले. यामध्ये बहुतांशी दस्तावेज हे मोडी लिपीतील आहेत. त्यातून कुणबीच्या २०,००२ नोंदी सर्व अकरा तालुक्यात सापडल्या.यामध्ये सर्वाधिक नोंदी या पाटण तालुक्यात १४ हजार सापडल्या आहेत.
साताऱ्यात २० हजार कुणबी नाेंदी! मराठवाड्यालाही मागे टाकले
