सातारा- गेल्या महिनाभरापासून वाट भरकटलेला तरस हा वन्य प्राणी सातारा शहरातील नागरी वस्तीत दिसू लागला आहे.या तरसाचा मुक्काम अजिंक्यतारा किल्ल्याच्या दक्षिण बाजूस असल्याचे बोलले जात आहे.
सुरुवातीला शहरातील माची पेठेत दिसलेला तरस पुन्हा शुक्रवार पेठ व शनिवार पेठेतील रस्त्यांवर आला होता.त्याला पाहताच भटकी कुत्री भूंकत असल्याने तो न्यू इंग्लिश स्कूलच्या मागे असलेल्या ओढ्यात लपून बसला होता. नागरिकांनी या तरसाला पकडण्याबाबत वनविभागाशी संपर्क साधला. वन कर्मचार्यांनी जागोजागी त्याचा शोध घेतला होता,पण तो प्रत्यक्ष हाती लागलेला नाही.आता शुक्रवार पेठेत व लगतच्या परिसरात तरसाचा वावर असल्याचे मध्यरात्री समोर आले. याची माहिती मिळाल्यानंतर सातारा वनविभागाच्या पथकाने त्याठिकाणी पाहणी करत आवश्यक त्या उपाययोजना तसेच शोध मोहीम राबवली. मात्र, तिथेही तरस सापडला नाही. काही जणांनी घरासमोरील सीसीटीव्ही फुटेजची पाहणी केली. यावेळी त्यात तरस वावरत असल्याचे व त्याचा पाठलाग कुत्री करत असल्याचे दिसून आले आहे.या पार्श्वभूमीवर नागरिकांना आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन वनविभागाने केले आहे.