सातारा- यंदाही सातारा शहरातील सर्वच रस्त्यांची पहिल्याच पावसात दुर्दशा झाली आहे. रस्त्यातील खड्डे आणि खड्ड्यात साचलेले पावसाचे पाणी वाहनचालकांच्या नाकीनऊ आणत आहे.
मागील चार दिवसांपासून सातारा शहरात पावसाने हजेरी लावायला सुरुवात केली आहे. या पावसामुळे पालिकेच्या कर्तबगारीचे पितळ उघडे पडले आहे. शहरातील अनेक रस्त्यांची चाळण झाली आहे. बॉम्बे रेस्टॉरंट चौक,राजलक्ष्मी टॉकीज,खण आळी मार्ग,राजवाडा बसस्टॉप परिसर आणि पेंढारकर हॉस्पिटल समोरील रस्त्यात मोठमोठे खड्डे पडले आहेत. पावसाचे पाणी साचल्याने हे खड्डे दिसून येत नसल्याने वाहनचालकांची वाहने आदळून मोठे नुकसान होत आहे. तरी हे खड्डे तत्काळ बुजवावे, अशी मागणी स्थानिक रहिवासी आणि वाहनचालकांनी केली आहे.