सातारा- मागील अडीच महिन्यांपासून सातारा जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया झालेल्या रुग्णांच्या औषधांचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.तरीही या रुग्णांना वेळेत औषध पुरवठा करण्याबाबत प्रशासन उदासीन आहे.
थॅलॅसिमिया हा अतिशय गंभीर असा अनुवंशिक आजार आहे.या आजारात बालकांच्या शरीरात जन्मतःच रक्त तयार होत नाही.त्यामुळे या बालकांना १५ ते २१ दिवसांतून रक्त द्यावे लागते.या आजाराचे जिल्ह्यात २०० रुग्ण आहेत.जगण्यासाठी त्यांना वारंवार बाहेरचे रक्त घ्यावे लागते.परंतु गेल्या अडीच महिन्यांपासून येथील जिल्हा रुग्णालयात थॅलॅसिमिया या आजारावरील औषधांचा साठा संपला आहे. जिल्हा रुग्णालयाच्यावतीने त्यासाठी राज्य रक्त संक्रमण विभागाकडे अनेकदा मागणी करण्यात आली आहे.परंतु त्याकडे दुर्लक्ष होत आहे.हे रुग्णालय या आजाराच्या औषधांचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य केंद्र आहे. तिथेही औषधे मिळत नसल्याने रुग्णांची याठिकाणी हेळसांड होत आहे.