सांगली – सातारा-कोल्हापूर पॅसेंजरचे इंजिन बंद आज पहाटे बंद पडले. त्यामुळे गाडी रहिमतपूर ते कोरेगावदरम्यान अडकून पडली. चालकांनी दुरुस्तीचे बरेच प्रयत्न केले. मात्र, बिघाड दूर झाला नाही. अखेर दुसरे इंजिन बोलावून घेऊन त्याने खेचून डेमू मार्गस्थ करण्यात आली. या खटाटोपात चार तास उशीर झाला. त्यामुळे प्रवाशांची मोठी गैरसोय झाली.
सकाळी साडेआठ वाजता मिरजेत येणारी पॅसेंजर दुपारी सव्वाबारा वाजता आली. ही ट्रेन चार तास उशिरा कोल्हापुरात पोहोचली. याचा फटका शेकडो नोकरदारांना बसला. कोल्हापुरातून चार तास विलंबाने म्हणजे दुपारी दोन वाजता तिची परतीची फेरी सुरू झाली. त्यामुळे अनेकांना मन:स्ताप सहन करावा लागला. सातारा ते कोल्हापूर मार्गावर धावणाऱ्या डेमूविषयी प्रवाशांच्या तक्रारी आहेत. पण त्यांची दखल रेल्वे प्रशासनाने कधीच घेतलेली नाही. ही गाडी वारंवार बंद पडते. तिची धावण्याची गतीही प्रतितास सरासरी ३० ते ४० किलोमीटर आहे.